सरकारकडून विकासकामांसाठी प्राप्त होणाऱ्या कोटय़वधीच्या निधीच्या खर्चाबाबत जिल्हा परिषदेला योग्य नियोजन न करता आल्याने हा निधी वाया जात असेल, तर या खर्चाचे लेखापरीक्षण करावेच लागेल, असा इशारा पंचायत राज्य समितीचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिला.
राज्याच्या पंचायत राज्य समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दांडेगावकर प्रथमच वसमतमध्ये आले. व्यापारी महासंघासह विविध संघटनांच्या वतीने त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार पंडितराव देशमुख, मुंजाजीराव जाधव, व्यापारी संघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतु, विनोद झंवर, बाजार समितीचे सभापती राजू पाटील, प्रल्हादराव राखोडे आदी उपस्थित होते.
दांडेगावकर म्हणाले, की राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या वार्षिक खर्चाची तपासणी, केलेल्या कामकाजाची पाहणी, त्याची अंमलबजावणी या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पंचायत राज्य समितीकडे आहेत. समितीचा प्रमुख म्हणून ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकारकडून प्राप्त होणारा निधी त्या गावापर्यंत पोहोचतो किंवा नाही, निधीतून झालेले काम, त्याचा दर्जा, निधीचा योग्य विनियोग झाला किंवा नाही याची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. ते म्हणाले, की काही मंडळी आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी स्वत:ची खुबी असलेले डिजिटल फलक झळकावून आपणच सामाजिक उपक्रम राबवितो, असे चित्र निर्माण करून प्रसिद्धी करून घेतात. मात्र, या मतदारसंघाचे १५ वर्षे नेतृत्व करणाऱ्यांनी या भागाचा काय विकास साधला, असा सवाल त्यांनी केला. वसमत स्थानकावर रेल्वे थांबण्याचे श्रेय लाटण्यासाठी चढाओढ करणारे या भागाचा विकास काय साधणार, असा टोलाही त्यांनी लगावला.