नव्या कार्यालयाचा क्रमांक ‘एमएच-४७’
वाहनाच्या नंबर प्लेटवरील ‘एमएच’ या अक्षरापुढील क्रमांकावरून वाहन कोणत्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदवले गेले आहे, हे ओळखण्याची सवय अनेकांना असते. आता अशा व्यक्तींना कोडय़ात टाकणारा एक क्रमांक लवकरच वाहनांच्या नंबर प्लेटवर दिसणार आहे. हा नंबर आहे ‘एमएच-४७’! परिवहन विभागाचे मालाड येथील मालवणी भागातील नवे प्रादेशिक परिवहन कार्यालय पुढील दोन-चार महिन्यांत सुरू होणार आहे.
अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पश्चिम उपनगरांतील लाखो वाहनचालकांचा भार आहे. हा भार हलका करण्यासाठी परिवहन विभागाने नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय मालाडमधील मालवणी या भागात सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा नवीन विभाग तयार होत असून तेथे चालकांच्या चाचणीसाठी फास्ट ट्रॅकसह संगणकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत. हे कार्यालय सुरू होण्यासाठी आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या परिवहन विभागाने दहिसर पश्चिमेतील कांदरपाडा भागात उपकेंद्र सुरू करण्याचे ठरवले आहे. या नव्या कार्यालयात नोंदणी होणाऱ्या वाहनांना ‘एमएच-४७’ हा क्रमांक देण्यात येणार आहे.हे नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन होत असताना या कार्यालयाच्या हद्दीतील सध्याच्या वाहनांना त्याचा कोणताही त्रास होणार नसल्याचे परिवहन विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन कार्यालय बदलले, तरी त्यासाठी कोणतेही ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्याची गरज नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी स्पष्ट केले. मात्र वाहनचालन परवाना हस्तांतरण, गाडीचे हस्तांतरण, वाहनचालकाच्या घराचा पत्ता बदलणे, अशी कारणे असल्यास त्यांना हे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

Story img Loader