ठाणे शहरातील स्वच्छतेचा तसेच नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अस्वच्छतेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात मलेरियाच्या रुग्णसंख्येत सुमारे १५ ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.  गेल्या सहा महिन्यात लेप्टोमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूसदृश प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, शहरात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही आरोग्य विभागाने बांधकाम व्यावसायिक तसेच गॅरेजवाल्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
जानेवारी ते जुलै या महिन्यात ४९ हजार ९७५ जणांच्या रक्तांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली असून त्यात एक हजार २८६ मलेरियाचे रुग्ण आढळून आले. यंदा जूनमध्ये १५० तर जुलै महिन्यात मलेरियाचे ३६६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी ५४ हजार ५४१ जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात १७२ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. तसेच जून महिन्यात १४८ तर जुलै महिन्यात ३६६ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. एकंदरीतच, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियांच्या रुग्णांमध्ये १५ ते २० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे दिसून येते. यंदा जानेवारी ते जुलै या महिन्यात डेंग्यूसदृश ६९ रुग्ण आढळले होते. त्यातील एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ६९ पैकी २० जणांचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. गेल्या वर्षभरात ७० डेंग्यूसदृश रुग्ण आढळले होते. त्यापैकी पाच जणांना लागण तर एकाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी शहरात स्वाइन फ्ल्यूसदृश असलेले १४ रुग्ण आढळले होते. मात्र, यंदा जून महिन्यात स्वाइन फ्ल्यूचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. गेल्या वर्षी लेप्टोचे २२ रुग्ण आढळले होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला होता.