शिक्षणसंस्था काढणे वा त्या चालविणे हे व्रत नव्हे तर धंदा झाला आहे. हे आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या तथाकथित शिक्षणसम्राटांचा सांप्रत काळात सुकाळ झाल्याचा अनुभव प्रत्ययास येतो. शैक्षणिक गुणवत्तेचा बट्टय़ाबोळ झाला तरी त्याची फारशी फिकीर न करता या शिक्षणसंस्थांना राजकीय अड्डय़ांचे स्वरूप देतानाच या संस्थांकडे भोगवस्तू म्हणून पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही. शैक्षणिक क्षेत्रात बोकाळलेली अनैतिकता, संस्थाचालकांची मनमानी, स्वार्थी वृत्ती या आणि यांसारख्या विविध कारणांमुळे या क्षेत्राला आजकाल बाजारी स्वरूप प्राप्त झाले आहे. या पाश्र्वभूमीवर पाऊणशे वर्षांपूर्वी सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील वाडय़ापाडय़ांवर अनवाणी फिरत आणि स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवत उत्तर महाराष्ट्रात तब्बल अठराशेपेक्षा अधिक स्वयंसेवी शाळा काढणारे मालेगावचे कर्मयोगी दोधू आनंदा तथा बोवा गुरुजी यांनी संस्थाचालक म्हणून केलेले कार्य फारच उच्च कोटीचे असल्याची साक्ष पटते. नाशिक जिल्ह्य़ात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या दोन्ही संस्थांची स्थापना व त्यांचा वटवृक्ष करण्याच्या कार्यात बोवा गुरुजींची तपश्चर्या कारणीभूत आहे. त्यामुळेच या संस्थांचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी त्यांच्या हयातीत गुरुजींना नेहमीच स्वच्छ मनाने याचे श्रेय दिल्याचे दिसून येई. आपण केवळ कुंकवाचे धनी असून या संस्थाचे खरे काम बोवादादांच्या कष्टामुळेच उभे राहिल्याचे भाऊसाहेब नि:संकोचपणे सांगत. पैसा, प्रतिष्ठा व प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा जन्मजात स्वभाव असणाऱ्या बोवादादांचे हे थोर कार्य मात्र कायम ‘अज्ञात’ राहिले.
दादांच्या शैक्षणिक क्षेत्रातील असामान्य कार्याचा ‘अज्ञात इतिहास’ समाजास व खास करून आजच्या पिढीला ज्ञात व्हावा म्हणून मालेगावच्या बोवादादा प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘प्रकाशाचे झाड’ या पुस्तकाचे नाशिक येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले. बोवादादांप्रति कृतज्ञता व्यक्त करणाऱ्यांचे लेख वेळोवेळी विविध वृत्तपत्रे वा नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. अशा लेखांचा या पुस्तकात संग्रह करण्यात आला आहे. ‘अर्थ उद्योग’ या मासिकाचे संपादक गोरख पगार यांनी या संग्रहाचे संपादन केले आहे.
सटाणा येथे जन्मलेल्या दादांना रानात गुरे सांभाळत-सांभाळत आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाल्यानंतर शिक्षणासाठी येणाऱ्या गरिबाघरच्या मुलांच्या जेवणाची तजवीज व्हावी म्हणून सटाणा येथे १९२६ मध्ये त्यांनी  स्वत:च्या घरात बोर्डिग सुरू केले. त्यानंतर उत्तरोत्तर त्यांचे कार्य वाढत गेले. त्यांची कीर्ती ऐकून १९३८ मध्ये भाऊसाहेब हिरे यांनी मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील शाळेत त्यांची नेमणूक करवून घेतली. भाऊसाहेबांच्या संपर्कात आल्यावर राजाश्रय लाभल्यामुळे दादांच्या शैक्षणिक कार्यास गती आली. दिवसा शाळेचे काम करून रात्री निमगाव परिसरातील खेडय़ांमध्ये जाऊन त्यांनी झपाटल्यागत शिक्षण प्रसार व प्रचाराचे काम हाती घेतले.
१९४६ मध्ये दादांनी नोकरीचा राजीनामा देऊन स्वत:ला पूर्णवेळ शिक्षण प्रसाराच्या कार्यात जुंपून घेतले. शिक्षणाचा जेथे गंध नव्हता अशा उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा व कोकणातील गावांमध्ये वेगवेगळ्या मंडळांच्या माध्यमातून अक्षरश: पायपीट करत त्या काळी त्यांनी अठराशेपेक्षा अधिक स्वयंसेवी शाळा सुरू केल्या. दादांच्या कार्याचा अवाका बघून असे बुवा जर प्रत्येक संस्थेत निर्माण झाले तर महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत भारतात अग्रेसर राहील, असा विश्वास कर्मवीर भाऊराव पाटलांनी व्यक्त केला होता.
बोवादादांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या वेगवेगळ्या शिक्षण मंडळांचे एकत्रीकरण करून कालांतराने महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या संस्था अस्तित्वात आल्या. या संस्थाचे सचिव म्हणून प्रदीर्घ काळापर्यंत त्यांनी काम पाहिले. स्वच्छ व अत्यंत निरलस असे कार्य करणाऱ्या दादांच्या पदरी भाऊसाहेबांच्या निधनानंतर विजनवास आला. पुढील काळात तर या संस्था व त्यांचे काही नातेच नसावे असाच जणू काही इतिहास जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. या संस्थांद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या कॅलेंडरवर संस्थापक म्हणून बोवादादांचे छायाचित्र नसणे वा वार्षिक अहवालात त्यांचा साधा नामोल्लेख नसणे, याविषयी पुस्तकात खंत व्यक्त झाली आहे.
यानिमित्ताने एक गोष्ट फारच खटकणारी वाटली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन व्हावे या प्रतिष्ठेपायी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या अमृतमहोत्सवी समारंभात हा प्रकाशन कार्यक्रम घुसडविण्यात आल्याने चटावरचे श्राद्ध उरकावे अशा धाटणीतला तो झाला. बहुधा मुख्यमंत्र्यांनादेखील बोवादादांचा इतिहास ज्ञात नसावा म्हणून एका शब्दानेही ते याप्रसंगी त्यांच्यावर बोलले नसावेत. त्यामुळे ही बोवादादांच्या कार्याची एक प्रकारे अवहेलना झाली असेच म्हणावे लागेल. प्रसिद्धी व प्रतिष्ठा या मोह-मायांपासून कायम दूर राहणाऱ्या दादांवरील पुस्तक प्रकाशनाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्यामुळे कार्यक्रमाचा असा विचका झाला व तसा तो होणे ही खरोखर दुर्दैवाची बाब. हे टाळता आले असते तर..

Story img Loader