कुटुंब नियोजनात महिलांपेक्षा पुरुषांवरील नसबंदीची शस्त्रक्रिया ही अधिक सोपी व यशस्वी होत असल्याच्या जनजागृती मोहिमा अनेकदा होत असूनही मुंबईसारख्या शहरातही गेल्या काही वर्षांत पुरुष नसबंदीची संख्या पुन्हा घसरली आहे. पुरुषार्थाच्या चुकीच्या कल्पना कवटाळून बसल्यामुळे आजही कुटुंब नियोजनासाठी पुरुष पुढाकार घेत नाहीत, असे चित्र दिसून आले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत दरवर्षी नसबंदी करून घेणाऱ्या पुरुषांची संख्या जवळपास ५० टक्क्यांनी कमी होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
छत्तीसगढमध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या ११ हून अधिक महिलांना जीव गमवावा लागला, त्या पाश्र्वभूमीवर तर नसबंदीसाठी पुरुषांनी स्वत:हून पुढे येण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तात्पुरत्या गर्भनिरोधक साधनांचा उपयोग करण्याच्या जागृती मोहिमांचा आजही फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही. त्यामुळे समाजाच्या आर्थिकदृष्टय़ा निम्न स्तरात लहान वयात प्रसूती व कुटुंबविस्तार होताना दिसतो. कमी वयात प्रसूतीच्या, मुलांच्या ओझ्याने दमलेल्या स्त्रियांवरच त्यानंतर कुटुंब नियोजनाची जबाबदारी ढकलली जाते. स्त्रियांची शस्त्रक्रिया ही अधिक जोखमीची असून पुरुषांच्या नसबंदी यशस्वी होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असते, हे वास्तव कोणीही नाकारत नाही. या शस्त्रक्रियेनंतर लैंगिक जीवनात कोणतीही कमतरता जाणवत नाही, याची वारंवार खात्री दिली जात असूनही पुरुष याबाबत माघार घेतात, असे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पुरुष नसबंदीमध्ये वृषणातून शुक्रजंतू घेऊन जाणारी नस बंद करून शुक्रजंतूंना अडवले जाते, तर स्त्रियांच्या शस्त्रक्रियेमध्ये अंडवाहिनीला चाप लावून ती बंद करून गर्भाशयामध्ये बीज जाण्यापासून रोखले जाते. स्त्रियांमधील ही वाहिनी शरीराच्या आतल्या भागात असून त्याच्या शेजारी नाजूक व महत्त्वाचे अवयव असतात. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे काहीसे जोखमीचे असते. त्या तुलनेत पुरुषांवरील नसबंदीची शस्त्रक्रिया ही सोपी, कमी वेळात होणारी असते. ही शस्त्रक्रिया केल्यावर तासाभरात घरी जाता येते व एका दिवसाच्या विश्रांतीनंतर काम करणेही शक्य होते. मात्र नसबंदी कमी जोखमीची असल्याची जनजागृती करूनही पुरुष नसबंदीपासून दूर राहिले आहेत. पालिकेकडून मोठय़ा प्रमाणावर नसबंदी मोहीम हाती घेतल्यावर सहा वर्षांपूर्वी पुरुष नसबंदीची संख्या वाढली होती. मात्र केंद्र सरकारने ५५० रुपयांवर ११०० रुपयांवर नेलेला प्रोत्साहन भत्ताही पुरुषांना या नसबंदीकडे वळवू शकलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा