माळीनगर (ता. माळशिरस) येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी या साखर कारखान्याने ८१ व्या वर्षांत पदार्पणाच्या निमित्ताने आपल्या यशातील हिस्सेदार असणारे सभासद, बाहेरील ऊस पुरवठादार शेतकरी, कामगार या सर्वाना एकत्रित मिष्टान्नाचे जेवण देऊन कारखान्याशी असणारी आपलेपणाची नाळ आणखी घट्ट करीत राज्यातील साखर कारखानदारीसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
सन १९३२ च्या सुमारास सासवड भागातील माळी समाजातील काही लोकांनी एकत्र येऊन या कारखान्याची उभारणी केली. तसं पाहिले तर सहकाराचे स्वरूप असणारा हा राज्यातील पहिलाच साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण यांनी या उद्योजकांच्या धाडसाच्या नियोजनाचे कौतुक केले होते. या कारखान्याच्या सभासदांच्या पूर्वजांनी या भागातील शेतक ऱ्यांच्या जमिनी खंडाने घेऊन, त्यामध्ये ऊस पिकवून हा कारखाना चालवीत होते. नीरा उजवा कालव्यावर त्यांनी १९३२ च्या सुमारास राज्यातील पहिली पाणी वाटप संस्था स्थापन केली होती. ही त्यांची दूरदृष्टी होती व आजही ही संस्था त्याच नियम, निकषांच्या आधारावर सुरू आहे हे त्यांचे नियोजन.
कारखान्याची दरम्यानच्या काळात खूप प्रगती झाली असली तरी कारखान्याकडे सभासदांच्या मालकीचा ऊस फारच कमी असल्याने कारखान्याने सभासद नसलेल्या लगतच्या शेतक ऱ्यांशी पूर्वीपासून आपलेपणाचं नातं निर्माण केलं असून ते अद्याप टिकवलं आहे. त्यातूनच या शेतकऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होणं, त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी शक्य तितकी मदत करण्याची परंपरा अद्याप जपली आहे. कारखान्याची गाळप क्षमता शेजारील कारखान्यांच्या तुलनेने कमी असल्यामुळे गाळप अर्थातच फायदा कमी असूनही हा कारखाना ऊसपुरवठा करणाऱ्या बिगर सभासद शेतकऱ्यांनाही इतर कारखान्यांच्या बरोबरीनेच दर देतो. शिवाय येथील वजनकाटय़ाबद्दलही ऊस उत्पादकात मोठा विश्वास आहे.
यंदाच्या गळीत हंगामात ऊसपुरवठा कमी होईल, असे अपेक्षित असतानाही जवळपास साडेचार लाख टन उसाचे गाळप झाले. याचा संचालक मंडळास मोठा आनंद झाला होता. त्यातच कारखान्याने ८१ व्या वर्षांत पदार्पण केले. या यशात सर्वाचाच वाटा असल्याचे प्रांजळपणाने कबूल करीत संचालक मंडळाने सभासद, बाहेरील ऊस पुरवठा करणारे शेतकरी, कामगार यांचेसह जेवण घेण्याचा बेत आखला. २ एप्रिल ही तारीख नक्की करून तयारीला लागले. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वाच्या घरी जाऊन निमंत्रणे दिली. तर वरिष्ठांनी भ्रमणध्वनी वरून आग्रह केला. २ एप्रिलच्या रात्री कारखान्याच्या गुलमोहोर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रांगणात एकच गर्दी झाली. कारखान्याचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे, कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे, उपाध्यक्ष वसंतराव ताम्हाणे नव्हे तर संपूर्ण संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी एवढय़ा मोठय़ा जनसमुदायाचे विनम्र स्वागत करीत होते. जेवणासाठी आग्रह करीत होते. रात्री उशीरापर्यंत सुमारे १५ हजार लोकांची जेवणे उरकली होती. या स्नेहबोजनातून कारखान्याने सभासद आणि अन्य ऊस उत्पादकांशी असलेला आपलेपणा, विश्वास आणखी दृढ केला. सहकारात सभासदांची जाणीव ठेवून त्यांना जोडून ठेवणारा असा हा उपक्रम बोलल्याचे जाते आहे.

Story img Loader