मलकापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थक नेत्यांविरुद्ध विलासराव पाटील-उंडाळकर व बाळासाहेब पाटील या उभय आमदारांच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपटले असल्याचे आज स्पष्ट झाले. अपेक्षेप्रमाणे स्थानिक नेतेमंडळींचा घाम काढणारी ही निवडणूक अवघ्या महाराष्ट्रभर गाजणार असल्याचे आज झालेल्या विरोधी यशवंत विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेवरून दिसून आले. गत खेपेचे किंगमेकर या खेपेस दंड थोपटून रिंगणात उतरत सत्ताधारी आघाडीचा ताकदीने बिमोड करणार असल्याचा दावा उंडाळकर व बाळासाहेब पाटील यांचा थेट पाठिंबा घेऊ पाहात असलेल्या नेतेमंडळींनी केला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या खास मर्जीतील युवानेते व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या हाती मलकापूर ग्रामपंचायत व आजमितीच्या नगरपंचायतीची गेली १३ वष्रे सत्ता आहे. अशातच पृथ्वीराज चव्हाण राज्याच्या नेतृत्वावर दाखल झाल्याने मलकापूरच्या विकासाला तुंबळ निधी प्राप्त झाला. २४ तास पाणी योजनेसह नवनवीन योजना साकारल्या गेल्याने मलकापूर मॉडेल सिटी म्हणून उदयास येऊ लागली. दरम्यान, नगरविकास आराखडय़ात जमिनी गेलेले छोटेमोठे शेतकरी आणि स्थावर मिळकत केलेल्या मिळकतदारांचा मोठा राग सध्या मनोहर शिंदे यांच्यावर दिसून येत आहे. मलकापूर नगरपंचायत हेच केवळ मुख्यमंत्र्यांच्या गटाचे घरच्या मैदानावरील एकमेव सत्तास्थान असल्याने कराड दक्षिण व उत्तरचेही पाटील आमदार ही निवडणूक लक्ष्य करून राहिले आहेत. यासंदर्भातील त्यांची पूर्वतयारी गेल्या वर्षभरापूर्वी झाली असून, त्याची प्रचिती आज झालेल्या पत्रकार परिषेदेवेळी दिसून आल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रारंभी मनोहर शिंदेंच्या सत्तेला आव्हान नसल्याचे चित्र होते. परंतु, गत पंधरवडय़ात मलकापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव थोरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या माध्यमातून प्रशासन भीतीच्या दबावाने निवडणूक यंत्रणा राबवत असल्याचा सरळसोट आरोप करून मनोहर शिंदे यांचा नामोल्लेख टाळत मुद्देसूद आरोपांची व टीकेची झोड उठवून खडे आव्हान दिले होते. त्यांच्या या पत्रकार परिषदेदरम्यानच मलकापूरच्या सत्तांतरासाठी अर्थात मुख्यमंत्री गटाच्या पाडावासाठी दोन्ही आमदार गटाने कंबर कसल्याचे बोलले जात होते. मात्र, आमदार बाळासाहेब पाटलांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक राजेंद्र प्रल्हाद यादव सध्या सत्ताधारी गटाच्या कळपात दिसून येत असल्याने तर्कवितर्क लढवले गेले. याचवेळी बाळासाहेबांचे जणू हाडवैरी बनलेले कृष्णा उद्योग समूहाचे युवानेते डॉ. अतुल भोसले हे मनोहर शिंदे यांच्याबरोबर कार्यक्रमांमध्ये झळकल्याने बाळासाहेब पाटलांचा गट सत्तांतराच्या तयारीसाठी सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. मलकापूरच्या राजकारणाला रंग चढत असतानाच काल मुख्यमंत्र्यांचे पाटण तालुक्याचे नेते हिंदुराव पाटील यांच्या गटाचा दस्तुरखुद्द त्यांच्या स्वत:च्याच मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीत तब्बल २५ वर्षांनी ऐतिहासिक पराभव झाला. माथाडी कामगारांचे आराध्य दैवत व मराठा महासंघाचे संस्थापक (कै.) अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आमदार नरेंद्र पाटील यांनी सत्तांतराची ही किमया सर्वच्या सर्व अकरा जागा जिंकून केली आहे. नरेंद्र पाटलांचेही मंद्रुळकोळे हेच गाव असून, राष्ट्रवादीने नव्याने त्यांना आमदारकीची दिलेली संधी फळास जाऊन नरेंद्र पाटील येथे ताकदीचे मल्ल ठरून राहिले आहेत. या प्रतिष्ठेच्या निकालानंतर होत असलेल्या मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने संवेदनशील बनू पाहात आहे. मंद्रुळकोळय़ाच्या ऐतिहासिक निकालाने सत्तांतराचीही जोरदार चर्चा सध्या मलकापुरात सुरू झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळानेही लक्ष घातल्याचे जाणकाराचे म्हणणे आहे. सध्या प्रतिष्ठेच्या निवडणुकांचा हंगाम सुरू होत असल्याने सर्वत्र मुख्यमंत्र्यांच्या गटाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सैन्य भिडणार का? असा सवालही जोरदार चर्चेत आहे. मनोहर शिंदे यांच्या विरोधातील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्षपद संभाजीराव रैनाक यांच्याकडे असून, गतवेळचे किंगमेकर सुहास कदम, राहुल भोसले यांच्यासह ताकदीच्या नेतेमंडळींचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे. यशवंत विकास आघाडी नोंदणीकृत असून, मलकापूर नगरपंचायतीमध्ये परिवर्तन अटळ असल्याचा ठाम दावा आज झालेल्या पत्रकार परिषदेत नेतेमंडळींनी केला, तर, नगरपंचायतीच्या कारभाराचे वाभाडे काढण्याची संधीही त्यांनी दवडली नाही. एकंदर चित्र पाहता विरोधकही तोडीस तोड उमेदवार देणार असल्याने विकासाच्या मुद्यावर मलकापूरकरांसमोर जाणाऱ्या मनोहर शिंदे यांचा गटातटाच्या राजकारणामुळे राजकीय अस्तित्वाचा फैसला होणार असल्याचे मानले जात आहे.
मलकापूरची निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी संवेदनशील बनणार
मलकापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थक नेत्यांविरुद्ध विलासराव पाटील-उंडाळकर व बाळासाहेब पाटील या उभय आमदारांच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपटले असल्याचे आज स्पष्ट झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-06-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malkapur election will sensitive for cm