केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा, जलनि:सारण व नगरविकास मंत्रालय दिल्ली जलबोर्ड व सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे पार पडलेल्या ‘आंतराष्ट्रीय वॉटर इंडिया-२०१३’ या कार्यक्रमात संपूर्ण देशातील जलतज्ज्ञांनी मलकापूर पाणी योजनेचे कौतुक केले.
कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तर समारोप केंद्रीय नगरविकासमंत्री श्रीमती दीपा दासमुन्शी यांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान, परिसंवादात पाण्याविषयी नावीन्यपूर्ण व आधुनिकतेने काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या परिसंवादामध्ये येथील २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण करण्यासाठी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व जीवन प्राधिकरणाचे माजी सचिव राजेंद्र होलाणी यांना आमंत्रित करण्यात आले.  
मनोहर शिंदे म्हणाले, की पाणी, ऊर्जा, बचत, पर्यावरण संवर्धन या बाबींचा मनुष्य जीवनाशी संबध आहे. पाणी हेच जीवन म्हणून पाणी या विषयावर काम केले पाहिजे. ही दूरदृष्टी ठेवून मलकापूर शहराच्या सुरळीत पाणी व्यवस्थापनासाठी केलेल्या प्रयत्नातून २४ बाय ७ पॅटर्नचा जन्म झाला. संपूर्ण देशाने योजनेस गौरविले. त्याही पुढे जाऊन आता मार्गदर्शक म्हणून केंद्र सरकारने नगरपंचायतीस संधी दिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
राजेंद्र होलाणी म्हणाले, की पाण्याची गरज नागरिकांना पटवून दिल्यानंतर ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. नदीतील पाणी शुद्ध राहावे म्हणून शहरात सांडपाणी प्रक्रिया योजना राबविणे आवश्यक असल्याने ही योजना शासनाकडे प्रस्तावित केली आहे. पाणी, ऊर्जा, पर्यावरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनीही योजनेचे कौतुक केले. नगरपंचायतीतर्फे जलअभियंता जाकीर शिकलगार,जे. डी. मुंडे उपस्थित होते.

Story img Loader