ठाणे शहरात मोठय़ा झोकात उभे राहिलेल्या बडय़ा व्यावसायिक मॉलमुळे शहरातील वाहतूक नियोजनाचे अक्षरश तीनतेरा वाजले आहेत. आरक्षित असलेल्या पार्किंग क्षेत्रापेक्षा कितीतरी मोठय़ा संख्येने वाहने या ठिकाणी येऊ लागल्यामुळे या मॉलना लागूनच असलेल्या शहरातील मुख्य तसेच सेवा रस्ते वाहतूक कोंडीचे आगार ठरू लागले आहेत. बडय़ा मॉल्सना भोगवटा प्रमाणपत्र देताना या ठिकाणी किती वाहने येऊ शकतात, याचा सविस्तर अभ्यास होणे गरजेचे होते. मात्र, विकास नियंत्रण नियमावलीतील वरवर प्रभावी वाटणाऱ्या कायद्याचा आधार घेत या बडय़ा व्यावसायिकांना परवानगी देण्यात आल्याने ठाण्याच्या वाहतुकीची अवस्था आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी बनली आहे.
पूर्व द्रूतगती महामार्गास लागूनच असलेल्या कोरम आणि विवियाना या दोन मोठय़ा मॉल्समध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठय़ा स्क्रीन्सची मल्टिप्लेक्सची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, या चित्रपटगृहांमधील आसनक्षमतेच्या तुलनेत अध्र्या पार्किंगची व्यवस्थाही या ठिकाणी नाही. त्याचे विपरीत परिणाम या भागातील वाहतूक व्यवस्थेवर दिसू लागले असून सेवा रस्त्यांवरील वाहने हलविताना पोलिसांनाही घाम निघू लागला आहे.
सेवा रस्ते कोंडीचे आगार
मुंबई-नाशिक महामार्गावरील सव्‍‌र्हिस रोडलगत इटरनिटी, त्यापाठोपाठ कोरम, विवियाना असे मॉल उभे राहिले. घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सव्‍‌र्हिस रोडलगत आर मॉल, बिग मॉल, कापूरबावडी येथील बिग बाझार असे मॉल उभे राहिले आहेत. यातील काही मॉलमध्ये सिनेमागृह उभारले गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सिनेमा पाहाण्यासाठी प्रेक्षकांची नेहमीच मोठी गर्दी असते. शनिवार आणि रविवारी तर हे सगळेच मॉल ‘हाऊसफुल्ल’ होताना दिसतात. मात्र, यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडू लागल्याने या ठिकाणी होणारी कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना खास पथक तयार करावे लागले आहे.
मॉलची निर्मिती करताना सिनेमागृहातील आसनक्षमता आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊ न मॉलमध्ये वाहनतळांची निर्मिती करणे अपेक्षित होते. मात्र, तशा प्रकारे मॉलमध्ये वाहनतळांचे नियोजन करण्यात आलेले नाही. काही मॉलमध्ये वाहन पार्किंगसाठी पैसे आकारण्यात येतात. त्यामुळेच मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावर उभी राहू लागल्याने शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे.
मॉलची वाहनतळ व्यवस्था..
नितीन कंपनी येथील कोरस मॉलमध्ये नामांकित ब्रॅण्डची दुकाने थाटण्यात आली आहेत. या ठिकाणी चार स्क्रीनचे चित्रपटगृह उपलब्ध आहे. त्यामुळे या मॉलमध्ये नागरिक मोठय़ा संख्येने खरेदी करण्यासाठी तसेच सिनेमा पाहण्यासाठी येतात. कोरम मॉलमध्ये सुमारे १२०० वाहने उभी करण्यासाठी वाहन तळाची व्यवस्था आहे. मात्र, चार चित्रपटगृहांमध्ये असलेली ८०० प्रेक्षकांची आसनक्षमता आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता ही वाहनतळाची व्यवस्था पुरेशी नसल्याचे शहरातील वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापैकी काही मॉलमध्ये मोफत पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहने पर्यायाने सव्‍‌र्हिस रोडवर उभी राहू लागली आहेत.
विवियानाचा धोका
आशिया खंडातील सर्वात मोठा मॉल म्हणून याच भागात उभा असलेल्या विवियाना मॉलमध्ये २४०० वाहने उभी राहू शकतात. या मॉलमध्ये १४ स्क्रीनचे चित्रपटगृह उभारण्यात आले असून ते अद्याप सुरू झालेले नाही. या स्क्रीनची आसनक्षमता २८०० इतकी आहे. तसेच हॉटेल्स, शॉपिंग सेन्टर्सची संख्याही या ठिकाणी मोठी आहे. मोठा गाजावाजा करत उभारणी सुरू असलेले चित्रपटगृह सुरू झाले तर या ठिकाणच्या पार्किंगची अवस्था काय होईल, याची भीती वाहतूक पोलिसांना आतापासूनच वाटू लागली आहे. दरम्यान, यासंबंधी कोरम आणि विवियाना मॉलच्या व्यवस्थापनांसोबत वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही. महापालिकेच्या नगररचना विभागाचे प्रमुख जितेंद्र भोपळे यांच्याशी संपर्क साधला असता मॉल व्यवस्थापनांनी नियमानुसार पार्किंगची सोय केली आहे का, हे पाहूनच परवानगी दिली आहे असे सांगितले.

फुकटेही जबाबदार..
अनेकदा मॉलमध्ये पुरेशी वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असूनही केवळ पैसे भरावे लागतील म्हणून अनेक वाहनचालक सेवारस्त्यांवर वाहने उभी करून जातात. पोलिसांनी अशा वाहनांवर वारंवार कारवाई केली आहे. तरीही फुकटेपणाची कास धरलेले हे वाहनचालक सेवारस्त्यांवरच वाहने उभी करतात. यामुळे मॉल व्यवस्थापनही हतबल बनले आहे.

Story img Loader