शेतीतील नवनवीन प्रयोगांमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे आपली गोदामे हजारो क्विंटल धान्याने भरून पडली असताना आजही आदिवासी पाडय़ांवर आढळणारे कुपोषण हा अभ्यासाचा विषय आहे. ही परिस्थिती शासनाचे अपयश अधोरेखीत करते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांनी केले.
येथील गंगाघाटावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘नवीन सरकारपुढील (खरी) आव्हाने’ या विषयावर दर्शने बोलत होते. १९९१ च्या खुल्या धोरणामुळे देशाच्या काही भागात विकासाची छोटी बेट तयार झाली. पण ही समृध्दी ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत अद्याप पोहचली नसल्याची खंत दर्शने यांनी व्यक्त केली. प्रगती समाजातील तळागाळापर्यंत नेणे हे सरकारचे काम असते. एकीकडे धान्याचे उत्पादन काढणारा शेतकरी दुखात तर दुसरीकडे बुहतेक जण उपाशी हे शासनाचे अपयश आहे. मोठे मनुष्यबळ असलेल्या देशात कंत्राटदारीने मोठे नुकसान होत आहे. राखीव जागांचा लाभ सर्व समाज घटकांना मिळणे गरजेचे असून त्याबाबत माध्यमातून सकारात्मक चर्चा व्हावी. आपल्याकडे आजही राज्यात अनेक कुपोषित बालके आहेत. तर देशातील अनेक गाव व शहरात अद्याप शौचालये नाहीत. निवारा नसल्यामुळे अनेक नागरीक रस्त्यावरच राहतात. देशातील जनतेला अपेक्षित मूलभूत सुविधा देण्यासाठी नव्या सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. यात अन्न, आरोग्य, निवारा आणि शिक्षण हे घटक शेवटच्या स्तरापर्यंत पोहचविण्याचे मोठे आव्हान समोर असल्याचे त्यांनी नमूद केले.
नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यावर गंगा आरतीला उपस्थित राहिले. त्यांनी गंगा स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. याआधी असा प्रयत्न झाला. परंतु त्यातून गंगेची सफाई होण्याऐवजी लोकांच्या हाताची सफाई दिसून आली असा टोलाही दर्शने यांनी लगावला.
गंगा स्वच्छता, तसेच देशाच्या आर्थिक धोरणामुळे बेरोजगार व ठेकेदाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या युवकांना शाश्वत रोजगार मिळवून देण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर असल्याचेही त्यांनी सांगितले
एकीकडे गोदामांमध्ये धान्य तर दुसरीकडे आदिवासी पाडय़ांवर कुपोषण
शेतीतील नवनवीन प्रयोगांमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे.
First published on: 27-05-2014 at 07:29 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malnutrition in aboriginal houses