ठाणे जिल्ह्य़ातील सुमारे चार हजारहून अधिक अंगणवाडी केंद्रांमध्ये पुरविण्यात आलेले साहित्य प्रत्यक्ष किमतीपेक्षा चार ते पाच पट अधिक दराने खरेदी करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील काही सदस्यांनी केला आहे. या साहित्य खरेदीत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या साहित्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात त्रुटी असल्याने कुपोषित बालकांच्या नोंदणीत चुका होऊन आकडा वाढत असल्याचे उघडकीस आले आहे.  
ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी केंद्रांना साहित्य पुरविण्यासाठी गतवर्षीच्या म्हणजेच २०१२-१३ च्या सुधारित अर्थसंकल्पात चार कोटी ४२ लाख ९३ हजार ५०५ रुपयांची तरतूद करण्यात आली होती. शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने एका परिपत्रकाद्वारे या योजनेस मान्यता देऊन दर स्वीकारण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला देऊ केले आहेत. या अधिकारानुसार महिला व बालकल्याण समितीने १९ मार्च २०१३ रोजी सभा घेऊन जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना वजनकाटे खरेदीसाठी ५० लाख रुपये, जलशुद्धीकरण यंत्रासाठी ३२ लाख ५० हजार रुपये, उंची मोजणाऱ्या पट्टीसाठी ५० लाख रुपये, हिरवा फलक (ग्रीन बोर्ड)साठी ४६ लाख ५० हजार, लहान खुर्चीसाठी ५० लाख रुपये, अशा प्रकारच्या एकूण दोन कोटी २९ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली होती. त्यानुसार, खरेदी करण्यात आलेल्या वजनकाटय़ाची किंमत बाजारात दोन ते अडीच हजार रुपये असतानाही मेसर्स नितीराज इंजिनीअरिंग या कंपनीकडून ५६१४ रुपयांना खरेदी करण्यात आले आहेत, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य ज्योती ठाकरे यांनी केला आहे. वजनकाटे विजेवर चालणारे असून निम्म्याहून अधिक अंगणवाडय़ांमध्ये वीज नसल्याने ते पडून आहेत. तसेच वजनकाटे निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक अंगणवाडीसेविकांनी तालुका कार्यालयात जमा करण्यास सुरुवात केली आहे, असेही त्यांनी सांगितले. याच पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रकाश पाटील यांनी वजनकाटे खरेदीसाठी खर्च केलेले पैसे पाण्यात गेल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत केला आहे. जलशुद्धीकरण यंत्रांची उंची पट्टी दोनशे ते तीनशे रुपयांत मिळत असतानाही १४९८ रुपयांना खरेदी करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात ही पट्टी चार फुटांची असताना तिच्यावर पाच फुटांचे चुकीचे माप दाखविण्यात आले आहे, असा आरोप सदस्य संदीप पवार यांनी केला आहे. अशीच अवस्था ग्रीन बोर्ड, बाकडे आणि खुर्ची खरेदीबाबतीही आहे, असा आरोपही सदस्यांनी केला.
नादुरुस्त वजनकाटे, चुकीची मापे दर्शविणारी उंची मोजणारी पट्टी यामुळे बालकांच्या श्रेणीकरणामध्ये फरक येत असल्याने बहुतेक मुले कुपोषित असल्याचे दिसून येत आहे. तसेच या साहित्यांमधील त्रुटींमुळे कुपोषित मुलांची संख्या वाढत असल्याने वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागत असल्याचे एका अंगणवाडीसेविकेने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.