डॉक्टरांच्या संशोधनकार्यामुळे मेळघाटातील कुपोषणाच्या गंभीर समस्येकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले होते. मात्र अजूनही कुपोषणाची समस्या संपलेली नाही. दर हजारी मुलांमागे ६० मुले पहिला वाढदिवस पाहत नाहीत, तर १०० मुले दुसऱ्या वाढदिवसाआधीच मरण पावतात. हे प्रमाण कमीतकमी दहापर्यंत खाली आले पाहिजे, असे वक्तव्य डॉ. कोल्हे यांनी पाल्र्यातील एका कार्यक्रमात केले.
‘जे गाव मला राहायला जागा देईल तेथे मी माझी वैद्यकीय सेवा सुरू करेन’ या साध्या अटीवर बैरागडमध्ये सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे या दाम्पत्याने त्या गावाला कायमचे आपलेसे केले. मेळघाटातील कुपोषणाची समस्या असो, दोन धर्मामधला संघर्ष असो, शिधावाटपाचा ‘मेळघाट पॅटर्न’ असो किंवा आदर्श शेतीचा प्रयोग असो, कोल्हे दाम्पत्याने प्रत्येक आव्हान यशस्वीपणे पेलले.
डॉ. रवींद्र कोल्हे यांनी बैरागडमधून वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली तेव्हा तिथे दोनच प्राथमिक उपचार केंद्रे होती आणि दोन डॉक्टर होते. आज तिथे सत्तर डॉक्टर कार्यरत आहेत. फिरती रुग्णालयेही आहेत. मात्र अद्याप तिथे शस्त्रक्रिया करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. म्हणूनच तिथे शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याचा त्यांचा मानस असून त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. डॉक्टरांना या कार्यात मदत करण्यासाठी ‘आर. जी. जोशी फाऊण्डेशन’च्या वतीने नुकताच ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ अर्पण करण्याचा कार्यक्रम विलेपाल्र्यातील नवीन ठक्कर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांना त्यांच्या आजवरच्या कार्याविषयी अभिनेत्री समिरा गुजर-जोशी यांनी बोलते केले.गांधी विचारांनी प्रेरित होऊन ग्रामीण भागातच वैद्यकीय सेवा करण्याचा निर्धार डॉ. रवींद्र कोल्हे यांनी केला होता. त्याची सुरुवात त्यांनी बैरागडमधून केली. मात्र, बैरागडमध्ये केवळ वैद्यकीय सेवेपुरतेच आयुष्य मर्यादित न ठेवता जसजशा समस्या आल्या तसतसे त्याचे निराकरण करण्यासाठी या दाम्पत्याने कसोशीने प्रयत्न केले. बैरागडमध्ये आल्यानंतर धनुर्वातावरची तेव्हा आठ आण्याला उपलब्ध असणारी लस मिळाली नाही म्हणून लोकांना प्राण गमावताना पाहिल्यानंतर आपले वैद्यकीय ज्ञान तेथील लोकांच्या उपचारांसाठी तोकडे पडते आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा एम.डी.चे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. त्याच वेळी त्यांना अभ्यासासाठी त्यांच्या वरिष्ठांनी ‘आदिवासींचे आरोग्य’ हा विषय दिला होता.  
या विषयावर प्रबंध लिहीत असताना केलेल्या संशोधनातूनच डॉक्टरांना तेथील कुपोषणाच्या समस्येची ओळख झाली. कुपोषणाची दोनशे कारणे डॉक्टरांनी शोधून काढली होती. पुढे बीबीसीच्या मदतीने या विषयावर एक विशेष कार्यक्रम तयार झाला आणि कुपोषण हा विषय जगासमोर आला, असे डॉक्टरांनी या वेळी बोलताना सांगितले. मात्र, अजूनही हा प्रश्न पुरता सुटलेला नाही. कुपोषणाबरोबरच तेथील लोकांच्या शिक्षणाचा प्रश्नही बिकट होत चालला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा