मनमाड नगर परिषदेच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून दैनंदिन बाजारपेठेचे काम सुरू असून या कामात कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला असल्याचा आरोप अॅड. एस. एस. डमरे यांनी केला आहे. पालिकेत कित्येक वर्षांपासून तीच ती नावे नगरसेवक म्हणून दिसत असली तरी पालिकेकडून कोणतीच विकास कामे होत नसल्याने शहराची अवस्था बिकट आहे. या विरोधात नागरिकांनी आवाज उठविण्याचे आवाहनही त्यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
मनमाड शहरात पांझण नदीच्या पूर्वेस अनेक वर्षांपासून आठवडे बाजार भरत होता. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी काँक्रीटचे अनेक चौथरे या ठिकाणी बांधण्यात आले. मात्र नगरसेवकांनी आठवडे बाजारातील सर्व ओटय़ांवर १५० बेकायदेशीर दुकाने बांधली. दुसरीकडे बाहेरील विक्रेत्यांना कुठल्याही प्रकारची पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही. दैनंदिन बाजारपेठेचे काम सुमारे १० वर्षांपासुन सुरू असून या कामात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. शहराला दैनंदिन बाजार व आठवडे बाजार या सोयी उपलब्ध नसल्याने शहरालगत चांदवड, नांदगाव, येवला या गावाहून येणारे भाजीविक्रेते व व्यावसायिकांची गैरसोय होत आहे.
परिणामी भाजीविक्रेते शहरात रहदारीच्या रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे बसत आहेत. यामुळे परिसरात साहजिकच अतिक्रमणही वाढत आहे.
नगर परिषदेच्या वतीने आठवडे बाजार व दैनंदिन बाजारपेठ अशी प्रत्यक्षदर्शी कुठल्याही प्रकारची सोय उपलब्ध करून दिलेली नसतांना ठेकेदाराची नेमणूक करणे बेकायदेशीर असून याबाबत ठेकेदार तसेच नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही अॅड. डमरे यांनी केली आहे. मनमाडच्या पोलिसांकडून पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही अॅड. डमरे यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा