विचारांना चालना देण्याची शक्ती ग्रंथातच आहे. चांगल्या पुस्तकांच्या वाचनामुळेच माणूस सुसंस्कृत बनतो, असे मत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय विचार मांडताना केले.
यवतमाळ ग्रंथोत्सव आयोजन समितीच्या वतीने नगर भवनात आयोजित करण्यात आलेल्या यवतमाळ ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रमाकांत कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कवी शंकर बडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पांढरे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा अनमोल आहे, असा उल्लेख करून जिल्हाधिकारी म्हणाले, साहित्यिक आणि कवीच्या विचारातून निर्माण झालेले साहित्य हे समाजावर संस्कार घडवणारे असते. राज्यात ग्रंथ साहित्य परंपरेचे स्थान उच्च आहे. त्यामुळे आदर्श समाजाच्या जडणघडणीसाठी प्रत्येक व्यक्तीत ग्रंथवाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. टी.व्ही. चॅनल्सद्वारे प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांतून चांगले काय आणि वाईट काय, याचाही समाजाने विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी चांगल्या वाचनाची सवय जोपासावी, तसेच नागरिकांनी या ग्रंथप्रदर्शनास भेट देऊन दर्जेदार पुस्तके संग्रही ठेवण्यासाठी खरेदी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.  
याप्रसंगी कवी शंकर बडे यांची ६३ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. वाचनामुळेच जीवन जगण्याची दिशा मिळतो. म्हणून प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रमाकांत कोलते यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
सुरुवातीस सरस्वतीदेवी व ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. कोलते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथांचे महत्त्व जाणले होते आणि या ग्रंथालयाची २ कोटी डॉलर्सला मागणी घालण्यात आली. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी हे ग्रंथालय माझा प्राण आहे. ते कोणत्याही किमतीला मी विकणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथप्रेम दिसून येते. खरोखरच ग्रंथ आणि ग्रंथकार हे आपल्या संस्कृतीचे भूषण आहे. विषाचा एक घोट तात्काळ कार्यभाग साधतो. मात्र, वाईट पुस्तकांचे वाचन वर्षांनुवर्षे विकार निर्माण करतात. त्यामुळे चांगले पुस्तके वाचण्याचीच सवय लावून घ्यावी, असेही डॉ. कोलते यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी कवी शंकर बडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकातून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी ग्रंथोत्सवाची पाश्र्वभूमी सांगितली. या ग्रंथोत्सव प्रदर्शनात नामांकित प्रकाशनाचे स्टॉल्स असून चांगली पुस्तके घेण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. हे ग्रंथ प्रदर्शन तीन दिवस राहणार आहे. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन सुरेश यांनी केले, तर आभार वरकड यांनी मानले.

Story img Loader