औद्योगिक कालखंडात यंत्राला महत्त्व प्राप्त झाले. पण जागतिकीकरणाच्या युगात व्यक्ती व यंत्र गौण ठरून प्रत्यक्ष निसर्गालाच गुलाम मानण्याची मानसिकता प्रबळ झाली. त्यातूनच पर्यावरणासंबंधीचे प्रश्न निर्माण झाले, व्यक्तीने जीवनासोबतच निसर्गाप्रतीही संवेदनशील असावे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत सुमन यांनी येथे केले.
अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयातर्फे ‘समकालीन पर्यावरणवाद व महात्मा गांधी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
पर्यावरणवादाची संकल्पना अधिक विस्तारपणे मांडताना डॉ. यशवंत सुमंत यांनी वृक्षारोपण करणे, स्वच्छता ठेवणे अथवा पर्यावरण विषय शिकवणे इतका संकुचित अर्थ पर्यावरणासंदर्भात अपेक्षित नसल्याचे अधोरेखित केले.
निसर्ग हा मानवी जीवनाचा एक अंगभूत घटक आहे. ज्याप्रमाणे व्यक्ती आपल्या जीवनाप्रती संवेदनशील असतो तितकाच तो निसर्गाप्रतीही संवेदनशील असावा ही अपेक्षा पर्यावरणवादात अपेक्षित आहे.
गांधींनी यांत्रिकीकरणाला विरोध केला नाही तर व्यक्तीचे मूल्य व सन्मान त्यासोबतच जपला जावा ही अपेक्षा व्यक्त केली होती. पर्यावरणवादाची संकल्पना पाश्चात्त्यांच्या नव्हे तर गांधीजींच्या भूमिकेतून समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
व्याख्यानाचा समारोप करताना पर्यावरणवाद हा वाद नव्हे तर विचार असून व्यक्ती, समाज व निसर्ग यांचा आंतरसंबंध व्यक्त करणारा भाव म्हणजे पर्यावरण वाद होय, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र मोहतुरे, सेवाग्राम आश्रमाचे माजी अध्यक्ष मारोतराव गडकरी तसेच राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण भागडीकर उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
केले.

Story img Loader