ढिसाळ कारभार अन् निधी खर्चाचा सोपस्कार
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत येथील जिजामाता क्रीडा संकु ल प्रेक्षागारात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय व जिल्हा बचत गट प्रदर्शनीच्या निमित्ताने प्रशासकीय गोंधळ व नियोजनातील ढिसाळपणा निदर्शनास आला. आयोजकांच्या अशा कारभारामुळे या प्रदर्शनीला अमरावती विभागातून उद्घाटनाच्या नमनाला म्हणजे पहिल्याच दिवशी स्वयंउत्पादित बचत गटांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनीत किमान १५० बचत गट सहभागी होतील, अशी अपेक्षा असतांना केवळ ६० बचत गटांनी उपस्थिती दर्शविली. एकूणच हा प्रकार म्हणजे उपलब्ध असलेला निधी खर्च करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला औपचारिक सोपस्कार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय व जिल्हा पातळीवर उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी प्रदर्शनी आयोजित करण्यात येतात. राज्याचा ग्रामीण विकास विभाग व त्याअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या प्रदर्शनींचे आयोजन करीत असतात. यावर्षी अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्य़ांसाठी बुलढाण्यात ही विभागीय प्रदर्शनी आयोजित करण्यात आली.
याचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले. या प्रदर्शनीला विभागात नोंदणी असलेल्या पंचवीस हजारांहून अधिक बचत गटांपैकी किमान १५० उत्पादित बचत गट हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या दिवशी केवळ ६० बचत गटांनी हजेरी लावली. अनेक स्टॉल्स रिकामेच होते. हजेरी लावलेल्या बचत गटांपैकी अनेक बचत गट वस्तूंचे उत्पादन करणारे नव्हते, तर त्यांनी दुसरीकडे तयार झालेले साहित्य आपल्या स्टॉल्समध्ये आणून प्रदर्शनीची औपचारिकता निभावली.
प्रदर्शनीत उत्पादित मालाच्या स्टॉल्सची क मतरता असताना भविष्य सांगणारा एक स्टॉल मात्र अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. या स्टॉलमध्ये एक ज्योतिषी भविष्य वर्तविताना दिसून आला. अंधश्रद्धेला खतपाणी देण्याचाच हा प्रकार होता. प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमात जादूटोणाविरोधी कायद्याच्या जनजागृतीचा स्टॉलही लावण्यात आला होता.
या कायद्याच्या माहितीच्या पुस्तिकेचे प्रकाशनही ग्रामविकासमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. अंधश्रद्धा समर्थन व निर्मूलन असा विरोधाभास या बचत गटाच्या प्रदर्शनीत दिसून आल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला.
बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्रदर्शनी महत्त्वाच्या ठरतात. यातून बाजारपेठ काबीज करत बचत गट आर्थिक सक्षम होऊ शकतात. मात्र, या प्रदर्शनीतून हा उद्देश सफल होताना दिसला नाही. परिणामत: जिल्हा व विभागीय प्रदर्शनीचा कोटय़वधीचा खर्च वायफळ जाण्याची दाट शक्यता आहे.
प्रदर्शनीच्या आयोजनात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेकडे जिल्हा परिषद हायस्कूल परिसरात विस्तीर्ण जागा असताना हजारो रुपये भाडे देऊन जिजामाता क्रीडा संकुलात हे प्रदर्शन भरविण्यात आले. भाडय़ापोटी ही खर्चाची विनाकारण उधळपट्टी करण्याचे कारण काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Story img Loader