ठाणेकरांना आपत्ती काळात तत्काळ मदत करणारा आपत्ती व्यवस्थापन विभागच सध्या कक्षामध्ये येणाऱ्या खोटय़ा तक्रारींमुळे त्रस्त झाला आहे. इमारत कोसळली, रस्त्यावर तेल सांडले आणि आग लागली आहे, अशा स्वरूपाच्या बोगस तक्रारींचे स्वरूप आहे. तसेच अग्निशमन विभागाकडेही अशा प्रकारचे खोटे दूरध्वनी येऊ लागले आहेत. या फसव्या दूरध्वनींमुळे दोन्ही विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी चक्रावले असून, असे दूरध्वनी करणाऱ्यांना रोखायचे कसे, असा मोठा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
ठाणे महापालिकेने चार वर्षांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाची निर्मिती केली असून, त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचारी असे २८ जण कार्यरत आहेत. शहरातील आपत्ती काळात तत्काळ मदत मिळावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. या विभागातील नियंत्रण कक्षात येणाऱ्या प्रत्येक दूरध्वनीची तातडीने दखल घेण्यात येते. गेल्या वर्षभरात या नियंत्रण कक्षात २३९१ तक्रारींचे दूरध्वनी आले असून, त्यामध्ये आग, झाड उन्मळून पडणे, जलवाहिनी फुटली, स्लॅब कोसळला, शॉर्ट सर्किट, वायुगळती, इमारत तसेच घर कोसळणे, अशा स्वरूपांच्या तक्रारींचा समावेश आहे. तसेच इमारत खचणे, रस्त्यावर तेल सांडणे, प्राणी तसेच पक्षी इमारतीवर अडकले आहेत, अशाही तक्रारी आल्या आहेत. नियंत्रण कक्षात येणाऱ्या प्रत्येक दूरध्वनीची खातरजमा करण्यात येते. मात्र, त्यातील काही दूरध्वनी प्रत्यक्षात घटनास्थळी गेल्यानंतर खोटे असल्याचे या विभागाच्या निदर्शनास येते. अशाच प्रकारचे खोटे दूरध्वनी ठाणे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात येतात. आपत्ती व्यवस्थापन तसेच अग्निशमन दल ठाणेकरांना आपत्ती काळात तत्काळ मदत पोहचविण्याचे काम करतात, पण या खोटय़ा दूरध्वनीमुळे दोन्ही यंत्रणांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा प्रकारचे दूरध्वनी करून यंत्रणेला वेठीस धरणाऱ्यांना रोखायचे कसे, याचा विचार दोन्ही विभागांकडून सुरू आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. या संदर्भात, ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख अरविंद मांडके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
 .. त्यात रिलायन्सच्या तक्रारींची भर
 रिलायन्सचा मोबाईल रिजार्च संपला असून तो लवकर पाठवा. मोबाईलचा बॅलेन्स लवकर का संपतो,  कळवूनही कॉलर टय़ून का बदलत नाही, अशा स्वरूपाचे चार ते पाच दूरध्वनी महापालिका आपत्तकालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षात दरदिवशी येत आहेत. त्यामुळे नियंत्रण कक्षातील कर्मचारी हैराण झाले आहेत. या वृत्तास आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दुजोरा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा