भगवान श्रीकृष्णाच्या रूपातील तुळजाभवानीमाता पाचव्या माळेच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण होते. तुळजाभवानीचे महंत तुकोजीबुवा यांनी विधीवत पूजा केल्यानंतर मुरली अलंकारातील जगदंबेचे सुमारे ३ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.
नवरात्र महोत्सवातील देवीची पाच रूपे पाहण्यास भाविकांची इच्छा असते. ९० वर्षे वा त्याहून अधिक वयाचे भाविक वाध्र्यक्याची तमा न बाळगता तुळजाभवानीचे नवरात्रातील दर्शन घेण्यासाठी परंपरेने व घराण्याचा खेटा पुढे चालू ठेवण्यास तुळजापूरात येतात. गेल्या २० वर्षांपासून लाखो भाविक पायी चालत येतात. पाचव्या माळेदिवशी इतर माळांच्या तुलनेत कमी भाविक होते.
नवरात्र काळात पार पडणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुळजापुरात उत्साहाचे वातावरण आहे. भाविकांची सेवा करणारे सर्व जाती-धर्माचे पुजारी भाविकांना मंदिरात आणणे व त्याचे विधी पूर्ण करून बसस्थानकांपर्यंत सेवाभावी वृत्तीने पोहोचविण्याचे काम करीत असल्याचे दृष्य सर्वत्र पाहावयास मिळत आहे. मध्यरात्री चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर पाचव्या माळेला सुरुवात झाली. सकाळी हजारो भाविकांनी दही-दुधाचे अभिषेक केले. नंतर नवेद्य व आरती करण्यात आली. दुपारी बारा वाजता अंगारा निघाला. त्यानंतर तुळजाभवानीचा साजशृंगार भोपे पुजाऱ्यांनी केला.
पाचव्या माळे दिवशी तुळजाभवानी मातेने श्रीकृष्णाचे रूप घेऊन भक्तांना दर्शन दिले. अत्यंत मनमोहक व लोभस भवानीमातेचे रूप पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले. जांभळया रंगाचा शालू आणि एक नंबर डब्यातील भरजरी दागिने देवीला घातले होते. गुलाबाचा हार व हातातील बासरी यामुळे देवीचे सौदर्य लक्ष वेधून घेत होते.

Story img Loader