खासदार सदाशिवराव मंडलिक व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वादाचे पडसाद सोमवारी येथील साखर सहसंचालक कार्यालयात उमटले. खासदार मंडलिक सहकारी साखर कारखाना, हमिदवाडा त्यांच्या व्यवस्थापनाकडून मुश्रीफ गटाच्या सभासदांवर केल्या जात असलेल्या अन्यायाचा पाढा साखर सहसंचालकांसमोर मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी वाचला. मागील आंदोलनाच्या वेळी मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांकडून साखर सहसंचालक कार्यालयात झालेल्या राडय़ाच्या पाश्र्वभूमीवर आज या कार्यलयासमोर मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. तर खबरदारीचा उपाय म्हणून मोजक्याच कार्यकर्त्यांनी चर्चेसाठी पाठविण्यात आले होते.    
मंडलिक-मुश्रीफ याच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. कागल तालुक्यातील हमिदवाडा येथील मंडलिक कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयावरून अलीकडे या दोन गटात वादाची पुन्हा ठिणगी पडलीआहे. मंडलिक गटाकडून मुश्रीफ गटाच्या सभासदांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो, अशी तक्रार या गटाकडून होत आहे. त्याचे सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी मुश्रीफ गटाचे १०० हून अधिक कार्यकर्ते आजसाखर सहसंचालक कार्यालयात आले होते.    
कागल पोलीसांकडून सुमारे १ हजार कार्यकर्ते तक्रार मांडण्यासाठी येतील, अशा स्वरूपाची माहिती पोलीस मुख्यालयाला प्राप्त झाली होती. या कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते साखर सहसंचालक कार्यालयात तक्रार मांडण्यासाठी आले होते, तेव्हा अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याबरोबर कार्यालयाची प्रचंड नासधूस करण्यात आली होती. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन आज कार्यालयाजवळ मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या प्रकर्षांने उठून दिसत होती.    
युवराज पाटील, प्रताप माने, गणपती फराकटे, राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष शिवानंद माळी, बाळासाहेब तुरूंबे, रघुनाथ कुंभार, राजेंद्र माने, रघुनाथ गोरवडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते या कार्यालयाजवळ आले, तेव्हा पोलिसांनी पूर्वानुभव लक्षात घेऊन निवडक कार्यकर्त्यांना आत सोडले जाईल, असे सांगण्यात आले. त्यावरून युवराज पाटील व पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद रंगला. पोलीस आपल्याच भूमिकेवर ठाम राहिले.    
युवराज पाटील यांच्यासह सात-आठ कार्यकर्त्यांना कार्यालयात सोडण्यात आले. उपसंचालक वाय.व्ही.सुर्वे यांना निवेदन देण्यात आले. मुश्रीफ गटाच्या सभासदांची आपसापोटी ऊसतोड थांबविण्यात आली आहे. त्यांच्याकडून शेअर्सची वाढीव रक्कम भरून घेतली जात नाही, त्यांना सभासदांची साखर देणे बंद केले आहे, आदी तक्रारी मांडण्यात आल्या. तसेच खासदार मंडलिक यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांच्या महालक्ष्मी दूध संस्थेला साखर कारखान्याने दिलेल्या ७ कोटी रुपयांची तातडीने वसुली करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सुर्वे यांनी दिले.