शिस्तबध्द पक्ष असलेल्या भाजपचे राजकीय पंडित जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत नापास झाल्याचे आज स्पष्ट झाले. पक्षाच्या दोन महिला उमेदवारांना पक्षाचे मिळालेले सर्व मतदान अवैध ठरल्याने भाजप नेत्यांवर नामुष्की ओढावली. या सर्व प्रकारामुळे पक्षाचे शहर अध्यक्ष, सुधार समितीचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेत्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अकोला जिल्हा नियोजन समितीसाठी मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र अर्थात, महापालिकेतून सहा जागांसाठी येथे निवडणूक झाली. यात भाजपमधून बडतर्फ व महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल (३७ मते) विजयी झाले, तर त्याच वेळी त्याच्या विरोधात खुल्या प्रवर्गात उभे असलेले महापालिकेचे भाजपचे विरोधी पक्षनेता हरिश आलिमचंदानी (२९ मते) पराभूत झाले. भाजप व शिवसेनेचे एकूण ३२ नगरसेवक असताना आलिमचंदानी यांना २९ मते पडल्याने इतर मते फुटल्याचे स्पष्ट होते. त्याचवेळी महापालिकेतील विरोधी पक्ष भाजपप्रणित अकोला शहर सुधार समितीचे अध्यक्ष सुनील मेश्राम यांनी ४१ मते घेऊन राखीव प्रवर्गातून विजयी झाले, पण हरिश आलिमचंदानी पराभूत झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ओबीसी प्रवर्गात काँग्रेसचे अजिज अहमद गुलाम रसुल ३४ मते घेऊन जिंकले. यात प्रवर्गात त्यांच्या विरोधात भाजपचे योगेश गोतमारे यांना ३२ मते मिळाली. ओबीसी महिला गटात शिवसेनेच्या देवश्री ठाकरे ३६ मते घेऊन विजयी झाल्या.
भाजपच्या शहर सुधार समितीच्या प्रमुखांनी या निवडणुकीत भाजपच्या महिला उमेदवारांना मतदान करताना अनुक्रमाने मतदान न करण्याचा सल्ला दिल्याची चर्चा दबक्या आवाजात येथे होती. महिला प्रवर्गातील भाजपचे सर्व मतदान अवैध ठरले. त्यामुळे भाजपच्या उज्ज्वला देशमुख यांना ६ मते, तर राजेश्वरी शर्मा यांना शुन्य मत मिळाले. त्यामुळे भाजपच्या या दोन महिला उमेदवारांचा पराभव झाला, तर काँग्रेसच्या उषा विरक (१९ मते), शांहिन अंजूम मेहबूब खान (१२ मते) या विजयी झाल्या. महिलांच्या या दोन जागांसाठी एकूण ३५ मते अवैध ठरली. या सर्व निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा झालेला पराभव व अवैध ठरलेली सर्व मते पाहता शहर अध्यक्ष, महापालिकेतील शहर सुधार समितीचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेता यांनी निवडणुकीचे नियम ज्ञात न करता या पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारून राजीनामा देण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. भाजप प्रणित शहर सुधार समितीचे अध्यक्ष सुनील मेश्राम यांना ४१ मते व सर्व खुल्या प्रवर्गातील महिलांच्या उमेदवारीत उज्ज्वला देशमुख यांना पक्षाची मिळालेली सर्व मते अवैध असताना मिळालेले ६ मते, शिवसेनेच्या देवश्री ठाकरे यांना मिळालेली अधिकची चार मते व राष्ट्रवादीच्या प्रशांत भारसाकळ यांना मिळालेली तीन मते हे महापालिकेतील सत्तारूढ महाआघाडीतील फूट स्पष्टपणे अधोरेखित करते. एकूण जिल्हा नियोजन समितीच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना पक्षांतर्गत फुटीचा फटका बसला, तर भाजपच्या नेत्यांनी नियमांचा अभ्यास न करता दिलेल्या आदेशाने त्याची मते अवैध झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, लहान नागरी निर्वाचन क्षेत्रातून मूर्तीजापूर नगरपरिषदेचे इब्राहिम कासम घाणीवाला यांनी अकोटच्या संजय बोडखे यांना पराभूत केले. तेल्हारा नगरपरिषदेच्या जयश्री अनंता मानखैर व पातूर नगरपरिषदेचे हाजी सै.बुरहान सै.नबी हे विजयी झाले. दरम्यान, या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पुढे आली.