कार्यक्रमांमध्ये रसिक श्रोते जेव्हा हसण्याच्या जागी टाळ्या आणि टाळ्यांच्या जागी हशा देतात, तेव्हा वक्त्याची मोठी पंचायत होते, असा प्रकार काही कार्यक्रमांमध्ये घडत असला तरी ठाण्यात मात्र सजग रसिकांमुळे असे प्रसंग घडत नाहीत. येथील रसिकांनी जिवंतपणे आणि मोकळ्या मनाने दिलेली दाद मला विलक्षण आवडते, असे सांगत कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी रविवारी ठाण्यातील रसिकांचे मन:पूर्वक कौतुक केले.
शारदा प्रकाशनच्या वतीने कवयित्री प्रतिभा भिडे यांच्या ‘विभ्रम’ या काव्यसंग्रहाचे मंगेश पाडगावकरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी कवी अशोक बागवे, डॉ स्मिता भिडे, प्रा. संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात कवी अशोक बागवे यांनी कवितांवरील आपल्या प्रेमाचे कथन केले. पाडगावकरांच्या कवितांवर दोन पिढय़ांनी प्रेम केले. कविता ही आयुष्याला वेढलेली असते, जन्मापासून मरेपर्यंत कवितासोबत असते.
‘‘कवितेवरील प्रेमामुळेच पाडगावकरांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो, ’’असे बागवे म्हणाले.  ‘यांचे असे का होते कळत नाही’, ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ आणि ‘नसलेल्या आजोबांचे असलेले गाणे’ अशा कविता पाडगावकरांनी या कार्यक्रमात सादर केल्या. यावेळी उपस्थित रसिकांनी पाडगावकरांना दाद दिली.
ठाणेकर श्रोते जिवंत आहेत, रसिक आहेत, प्रत्येक वाक्याला, कवितेला योग्य ठिकाणी योग्य आणि भरभरून दाद देतात, अशा शब्दांमध्ये पाडगावकरांनी ठाणेकरांचे कौतुक केले. लहानपणापासून आपणास ठाण्याविषयी मोठे आकर्षण आणि कुतूहल होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader