कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा संपूर्ण जीवनप्रवास त्यांच्या कवितांसह त्यांच्याच शब्दात ‘माझे जीवन गाणे’ या डिव्हीडीच्या माध्यमातून रसिकांसमोर येणार आहे. सांगली येथील ‘चैतन्य मल्टिमिडिया’ यांनी ही डीव्हीडी तयार केली असून येत्या १९ मे रोजी मुंबईत माटुंग्यातील कर्नाटक संघाच्या सभागृहात या डीव्हीडीचे प्रकाशन होणार आहे.
गिरगावातील ‘माधवाश्रम’मध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ‘चैतन्य मल्टिमिडिया’चे डॉ. बाळकृष्ण चैतन्य यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेस पाडगावकर, या डीव्हीडीमध्ये ज्यांनी पाडगावकर यांच्याशी संवाद साधला आहे ते प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे हे ही उपस्थित होते. दोन डिव्हीडींच्या भागात पाडगावकर यांची ही प्रदीर्घ मुलाखत असून पाडगावकर यांच्यानंतर गायक-अभिनेते प्रसाद सावकार यांच्यावरील अशाच प्रकारची डिव्हीडी आम्ही तयार करणार आहोत. गायक-संगीतकार पं. यशवंत देव यांच्याशीही अशा प्रकारची डिव्हीडी तयार करण्याबाबत बोलणे झाले असल्याचेही डॉ. चैतन्य यांनी सांगितले.येत्या १९ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमास पाडगावकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ सतारवादक शंकर अभ्यंकर, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. व्ही. एन. श्रीखंडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी पाडगावकर हे काही निवडक कवितांचे वाचन करणार असल्याची माहिती डॉ. चैतन्य यांनी दिली.चित्रपटासाठी दुसऱ्याने लिहिलेल्या प्रसंगावर गीत लिहावे लागते आणि ते मला पटत नाही. मला आतून काहीतरी सुचले तरच मी कविता लिहितो. चित्रपटासाठी तसे होत नाही. प्रसंगानुरूप गाणे लिहावे लागते. तसेच सेन्सॉर बोर्डावर मी काही वर्षे परीक्षक म्हणून काम करत होतो. तेथे काम करत असताना चित्रपटासाठी गीत लिहिणेही मला योग्य वाटले नाही, त्या मुळे चित्रपटासाठी आजपर्यंत गीतलेखन केले नाही, असे पाडगावकर यांनी सांगितले. भाऊ मराठे यांनी सांगितले की, मराठी साहित्यात अशा प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच तयार झाला आहे. आजवर मराठीतील साहित्यिक किंवा कवीचे दस्तावेजीकरण झालेले नव्हते. तर पाडगावकर यांनी, माझ्यावर आणि माझ्या कवितांवर प्रेम करणाऱ्यांना तसेच मराठी कवितेविषयी आस्था असणाऱ्यांना ही डीव्हीडी नक्की आवडेल, असा विश्वास व्यक्त केला.