गारपिटीमुळे मोठय़ा प्रमाणात आंब्याच्या झाडाची नासधूस बघता यावेळी विदर्भातील बाजारपेठांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत आंब्याची आवक कमी झाली आहे. एरवी या दिवसात स्वस्त मिळणारा आंबा सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडणारा आहे. सध्या फळांचा राजा असलेला आंबा शहरातील बाजारपेठेत उपलब्ध असला तरी सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारा पल्ला त्याने गाठला आहे.
यावर्षी गारपिटीमुळे विदर्भात मोठय़ा प्रमाणात आंब्याची झाडांची नासधूस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोडी आलेला घास हिरावून घेतला आहे. साधारणत: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बाहेरून मोठय़ा प्रमाणात आंबा बाजारात येत असताना यावेळी मात्र आब्याची आवक कमी झाली आहे. गारपिटीच्या आधी चांगला पाऊस झाल्याने आंबा मोठय़ा प्रमाणात बहरला होता. आंब्याचे पीक जोरदार येईल आणि यावर्षी तरी आंबा स्वस्त होईल, अशी अपेक्षा होती. परंतु मध्यंतरी झालेल्या वादळी वाऱ्याने आणि गारपिटीमुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आणि गरिबांच्या अपेक्षांवर पाणी पडले. इतरवेळी काही होवो, पण एप्रिल आणि मे महिन्यात आमरस आणि पोळी हा बेत असतोच. या पाश्र्वभूमीवर आंब्याची म्हणावी तशी आवक नाही. शहरातील कॉटेन मार्केट, बुधवार बाजार, कळमना येथील बाजारपेठेत आंबा विक्रीला आला असला तरी तो सर्व आंध्रप्रदेश, गुजरात, कोलकाता, तामिळनाडू आणि मध्यप्रदेश या राज्यातून आंबा बाजारपेठत आला आहे. महाराष्ट्रात काही शहरात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे आब्यांची आवक कमी झाली असली जो येतो तो सध्या तरी खिशाला परवडणारा नाही.
शहराच्या विविध भागात हात ठेलेवाले आंबे घेऊन फिरताना दिसत आहेत. ‘गोड गोड आंबा’, ‘रसाळ आंबा’, ‘लोणच्याचा आंबा’ असे ओरडून पुरुष व महिला विक्रेते ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. बाजारात विविध प्रकारचे आंबे आले आहेत. बैगनपल्ली आंबा ५० ते ८० रुपये किलो प्रमाणे विक्रीला आहे. निलमची आवक पाहिजे त्या प्रमाणात नसल्यामुळे लोक बैगनपल्ली आंब्याची खरेदी करीत आहेत. सर्वात महागडा हापूस आंबा २५० ते ३०० रुपये किलोप्रमाणे बाजारात विक्रीला आहे.
 गावरान आंब्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ५० रुपये डझनपासून सुरुवात होऊन सुमारे १२० रुपयांपर्यंत भाव आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंबे खाण्यावर बरेच नियंत्रण ठेवावे लागणार आहे. गावरान आंब्यांच्या तुलनेत निलम व कलमी आंब्यांचे भाव बरेच कमी आहेत. बाजारात गावरान आंबा फारसा उपलब्ध नाही. यावर्षी आंध्र, कर्नाटक व कोकणातून आंबा मोठय़ा प्रमाणात आला आहे. सध्या आंबा महाग झाल्यामुळे त्याचा परिणाम रसावरही झाला आहे. लोणच्यासाठी लागणारा आंबा ४० ते ५० रुपये किलो प्रमाणे बाजारात विक्रीला आहे. यावर्षी शेतातील कैऱ्यांनी लगडलेली झाडे सुकू लागली आहेत. काही झाडे तर वाळून गेली आहेत. अचानक अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आंबा उत्पादनाला ग्रहण लागले आहे. यंदा उशिरा म्हणजे मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात गावरान आंबा बाजारात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा