देश-विदेशातील फळ बाजारात आपले वेगळे अस्तित्व दाखविणाऱ्या कोकणातील हापूस आंब्याची आवक जानेवारीपासून काही प्रमाणात सुरू झाली असली तरी उद्या गुढीपाडव्यापासून ही आवक खऱ्या अर्थाने मोठय़ा जोमाने वाढणार आहे. दरवर्षी गुढीपाडव्यापासून ८० ते ९० हजार पेटय़ा हापूस मुंबईत विक्रीसाठी येत असतो. अलीकडे उत्पादन घटल्याने थोडा कमी येणार असला तरी दिवसाला ६० हजार पेटय़ांचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी हापूस आंब्याचा मोसम लवकर संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चार हापूस आंबे घरच्या देवाला नैवेद्य म्हणून ठेवल्यानंतर ते मुंबईत पाठवण्याची परंपरा आजही काही कोकणस्थ बागायतदार जपून आहेत.
काल्टरच्या जमान्यात हापूस आंब्याचे आगमन दोन महिन्यांपूर्वीच होऊ लागले आहे. त्यामुळेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कोकणातील हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत आली होती. त्यानंतर बाजारपेठेत हापूस लवकर काढून पाठविण्याची जणूकाही कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. तरीही काही व्यापारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच हापूस बाजारपेठेत पाठविण्याच्या परंपरेला आजही धरून आहेत. स्पर्धेच्या या जगात टिकून राहण्यासाठी हापूस लवकर बाजारात पाठविणारे बागायतदारही या दिवसासाठी चांगले फळ राखून ठेवत असल्याचे फळ संचालक संजय पानसरे यांनी सांगितले. ३०-४० वर्षांपूर्वी हापूस आंब्याची गुढीपाडव्याच्या दिवशी कोकणात विधिवत पूजा केली जात असे. त्यानंतर झाडावरून आंबा उतरवून लोखंडी पेटय़ातून मुंबईत पाठविला जात होता. त्यासाठी एसटी किंवा बोटींचा वापर केला जात असल्याच्या आठवणी आजही काही व्यापारी सांगतात. हापूस आंब्याची बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ मानली जात असल्याने या फळाच्या विक्रीसाठी अनेक व्यापारी वर्षभर तयारी करीत असल्याचे समजते.