उरण तसेच जेएनपीटी परिसरात मोठय़ा प्रमाणात विकासाची कामे सुरू असून या विकासकामांच्या आड येणाऱ्या खारफुटीवर अतिक्रमण करीत मातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट केली जात आहे. बोकडविरा परिसर तसेच इतर ठिकाणी खारफुटीच्या झाडाखाली पाणी असतानादेखील खारफुटीची झाडे करपू लागली आहेत. त्यामुळे खारफुटी नष्ट करण्यासाठी रसायनांचा वापर केला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र उरण परिसरात कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर झाला नसल्याचा खुलासा उरणच्या वन विभागाने केला आहे.
उरणमधील द्रोणागिरी नोड परिसरातील सिडकोच्या साडेबारा टक्के भूखंडावर विकासकांची इमारतींची कामे सुरू आहेत. अशा अनेक ठिकाणी खारफुटी असून या खारफुटीवर मातीचा भराव करून ती नष्ट केली जात आहे. बोकडविरा परिसरातील उरण-पनवेल रस्त्यालगतच्या खारफुटीचा अडथळा असल्याने मे महिन्यात येथील खारफुटी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. सध्या याच ठिकाणच्या खारफुटी करपू लागली आहेत. त्यामुळे खारफुटी नष्ट करण्यासाठी रसायनाचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात उरण विभागाचे वनसंरक्षक चंद्रकांत मराठे यांनी, खारफुटीवर कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर करण्यात आलेला नाही. या काळात खारफुटीच्या झाडांना नवीन पाने फुटतात तसेच वातावरणातील बदलामुळे खारफुटी पिवळी पडली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारे खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास अशांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांना सांगितले.

Story img Loader