मुंब्रा पश्चिम रेल्वे स्थानकापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या महातार्डेश्वर मंदिराच्या पूर्व बाजूकडे असलेल्या खारफुटीच्या जंगलांची वाळूमाफियांकडून जोरदार कत्तल सुरू असून ठाणे जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यादेखत या भागात भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वी घडलेल्या मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे जिल्ह्य़ातील भूमाफियांच्या मुसक्या काही प्रमाणात आवळण्यात आल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंब्रा तसेच आसपासच्या परिसरात वाळूमाफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून सर्वाच्या डोळ्यादेखत दिवसरात्र या भागात तिवरांच्या झाडांची कत्तल सुरू आहे. महातार्डेश्वर मंदिर परिसरात तर सुमारे २५ एकर क्षेत्रफळात तिवरांची जंगले या माफियांनी ओसाड करून टाकली असून यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये कमालीची अस्वस्थता व्यक्त होत आहे.
मुंब्रा, डोंबिवली, दिवा भागातील तलाठी, मंडळ अधिकारी, स्थानिक पोलीस यांच्या संगनमताने हे सर्व प्रकार सुरू असल्याची चर्चा असून एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या जंगलतोडीविषयी कुणी ‘ब्र’देखील उच्चारण्यास तयार नाही, अशी परिस्थिती आहे. मुंब्रा पश्चिम उड्डाण पुलापासून काही अंतरावर खारफुटीने वेढलेला विस्तीर्ण भाग माफियांनी सपाट करून टाकला आहे. या वाळूउपशाच्या बाजूला रेल्वे मार्ग आहे. रेल्वे प्रशासनही याबाबत महसूल विभागाशी पत्रव्यवहार करून हा गैरप्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने लोकलने दररोज प्रवास करणारा प्रवासी या सगळ्या प्रकाराने आश्चर्यचकित झाला आहे. खारफुटीचे संवर्धन व्हावे म्हणून न्यायालय, शासनाने वेळोवेळी स्थानिक महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे स्थानिक पातळीवर होत नाही हेच यामधून स्पष्ट होत आहे.
वाळूमाफियांकडून दिवसा हे काम पूर्णपणे थांबवण्यात येते. सूर्यास्त होताच माफियांचा मोठा गट पुन्हा सक्रिय होतो आणि तिवरांची छाटणी सुरू होते. वाळूउपशासाठी वाट्टेल ते या न्यायाने तिवरांची झाडे अक्षरश: उखडण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. वाळूउपसा सुरू आहे हे दिसू नये म्हणून बोटीवर फक्त केरोसिनचा एक कंदिल मिणमिणता ठेवण्यात येतो. पहाटे पाच वाजेपर्यंत हे वाळूउपशाचे काम बिनबोभाटपणे सुरू असते. दिवसा हे वाळूमाफिया आपल्या बोटी डोंबिवली, कोपर, मुंब्रा परिसरातील खाडीच्या भिवंडी शहराच्या बाजूने उभ्या करतात. त्यांचे सक्शन पंप, बोटी नांगरून ठेवण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसते.  रात्रीच्या वेळेत खारफुटीची झाडे तोडून ती लाकडे बोटीत टाकून जळणासाठी वाहून न्यायची, असे दुहेरी उद्योग वाळूमाफिया करीत असल्याचे बोलले जाते.

Story img Loader