लोकांच्यातून कधीही निवडून न येणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना सर्वसामान्यांची सुखदु:खे काय समजणार? केवळ एकमेकांची उणीदुणी काढून जनतेचा विकास साधता येत नाही, तर त्यासाठी ठोस कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जावे लागते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेच्या किसान चौकात झालेल्या जाहीर सभेत केले.
सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता पवार यांच्या प्रमुख भाषणाने झाली. यावेळी बोलताना पवार यांनी माणिकराव ठाकरे यांच्यासह उद्योगमंत्री नारायण राणे,वनमंत्री डॉ. पतंगराव कदम,  यांच्यावर टीकेची झोड उठविली. तसेच, भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही जोरदार प्रहार केले.
 सांगली महापालिका प्रचारामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर जहरी टीका केली होती. याचा खरपूस समाचार पवार यांनी आपल्या जाहीर सभेत घेतला. एकमेकांची उणीदुणी काढून शहराचा अथवा जनतेचा विकास साध्य होत नसतो. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आम्हाला ज्ञान सांगण्यासाठी आले होते. त्यांनी अगोदर जनतेतून निवडून येऊन दाखवावे. राष्ट्रवादीचे नेते लाखांच्या फ़रकाने निवडून येतात. सर्वसामान्यांच्यात मिसळून असल्यामुळे त्यांना सामान्यांची सुखदु:खे समजून घेता येतात.
पवार पुढे म्हणाले की, आपण औट घटकेचे राजकारण कधी करीत नाही.   िपपरी-चिंचवड महापालिका एकहाती राष्ट्रवादीकडे असल्यामुळे देश पातळीवर नावाजलेले शहर म्हणून विकास करता आला. केवळ बिनबुडाचे आरोप करुन शहराचा विकास साधता येत नाही अथवा नागरीकरणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांची उकल करता येत नाही.
डॉ. पतंगराव कदम राष्ट्रवादीवर टीका करतात. मात्र त्यांना चांगले खातेही मिळविता येत नाही. माजी मंत्री मदन पाटील यांना उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. मात्र या महामंडळाला गेल्या दोन वर्षांत एक दमडीचाही निधी उपलब्ध झालेला नाही. अशा पद्धतीने राजकारण करुन जनतेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत.
भाजपाचे खा. गोपीनाथ मुंडे सांगलीत येऊन खोटे बोलून गेले, असे सांगून पवार म्हणाले की, त्यांच्याच परळी पंचायत समितीचा सदस्य राष्ट्रवादीचा झाला.  धनंजय मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजाभाऊ मुंडे आज तुरुं गात आहेत. अशी अवस्था मुंडेंची आहे.  त्यांना माणसे सांभाळता येत नाहीत; मी मात्र केवळ नजरेने काम करतो. मुंबईतील चेंबूरमध्ये ज्या टोळ्या कुप्रसिद्ध होत्या त्यापैकी एका टोळीचा म्होरक्या  कोण होता, हे माहिती अधिकाराखाली कोणीही माहिती घेऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.  
वसंतदादांनी विकासाचे राजकारण केले. मात्र त्यांच्या वारसदारांनी साखर कारखाना, सहकारी बँक यांची काय अवस्था केली आहे? अशा मंडळींच्या शब्दावर विश्वास ठेवण्यास जनता राजी नाही असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 या वेळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना सांगितले की,  आज आमच्यावर गुन्हेगारीकरण केल्याचा आरोप होतो, हा राजकारणातला एक मोठा विनोद आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसत असताना कणकेची मांडी लावून बसावी लागते की काय अशी परिस्थिती आहे. कारण प्राचीन काळी यज्ञ करीत असताना बलिदान द्यावे लागत होते. त्या वेळी गाईऐवजी कणकेची गाय करुन बळी दिला जात असे. गुंडगिरीचा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपला मध्यप्रदेशातील अर्थमंत्र्यांना का राजीनामा द्यावा लागला, दंगलीचे लाभार्थी कोण आहेत याची उत्तरे द्यावी लागतील, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.
महापालिका स्थापनेनंतर दहा वर्षे काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्या कालावधीत काय विकास झाला याची उत्तरे यांच्याकडे नाहीत. त्यामुळे आम्हाला नाकर्ते ठरविण्याचा त्यांना अधिकार नाही. शहरातील व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोध आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी ‘व्हेस्मा’ लावण्याची भीती दाखविली जाते. जर आंदोलकांच्यावर अशी कारवाई करण्याचे प्रसंगच आले तर तुरु ंग पुरणार नाहीत. व्यापाऱ्यांना अडचणीचा ठरणारा कर लावण्यास राष्ट्रवादीचा विरोध राहिल, असेही आर. आर. पाटील यांनी सांगितले.  
महापालिका निवडणूक प्रचारात काँग्रेस व भाजपाने हातमिळविणी केली असल्याचा आरोप करुन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, मी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला माझे डोके फ़िरलेले नाही. त्यापेक्षा घरात बसून राष्ट्रवादीचे कार्य करेन.
सांगली महापालिकेसाठी विकासाचे काम घेऊन आपण पुढे आलो आहोत. हे शहर अग्रगण्य व्हावे यासाठीच विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून राष्ट्रवादी निवडणूक रिंगणात उतरली आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. या वेळी जनसुराज्य पक्षाचे आ. विनय कोरे यांनीही राष्ट्रवादी व जनसुराज्यला विजयी करण्याचे आवाहन केले.

Story img Loader