येवल्यासह इतर तालुक्यांचा पाणीप्रश्न कायमचा दूर व्हावा, यासाठी मांजरपाडा धरण बांधण्यात येत असून ते आता पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी येवला तालुक्यातील बल्हेगाव येथे दिली.
बल्हेगाव येथे जनसुविधा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येवला पंचायत समिती सभापती शुभांगी पवार, सरपंच लीलाबाई जाधव, उपसरपंच लताबाई जमदाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर भुजबळ यांनी केवळ दोन वेळा येवला येथे भेट दिली होती. त्या भेटींमध्ये राजकीय घडामोडींविषयीच अधिक चर्चा झाली होती. भुजबळ हे आगामी विधानसभा निवडणूक येवल्यातून लढवितात की मतदारसंघ बदलण्यात येतो याविषयी विविध तर्क करण्यात येत असताना तालुक्यात पुन्हा एकदा विविध विकासकामांना भुजबळ यांनी सुरुवात केल्याने त्यांचे भविष्यातील राजकारण नेमके आहे तरी काय, असा प्रश्न विरोधकांसमोर उपस्थित झाला आहे.
येवला तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींना कार्यालये बांधून दिली असून त्यावर चार कोटी १० लाख रुपयांचा निधी खर्च झाला. निफाड तालुक्यात १५ ग्रामपंचायतींना कार्यालये बांधून दिली असून त्यासाठी एक कोटी ५० लाख रुपये खर्च आल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. येवला तालुक्यात विविध विकासकामांवर आतापर्यंत कोटय़वधी रुपयांचा खर्च झाला आहे. विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवासुविधा पुरविल्या आहेत. येवला येथे रुग्णालय, प्रशासकीय इमारत, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत, ट्रॅफिक पार्क आदी कामे करण्यात आली आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी बंधारे बांधण्याकरिता आमदार निधीतून खर्च करण्यात आला असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.
देवीचे कोटमगाव येथेही विकासकामे सुरू आहेत. स्मशानभूमींसाठी येवला तालुक्यात दोन कोटी ७५ लाख रुपये, तर निफाड तालुक्यात एक कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय आगामी काळातही विकासकामे सुरूच राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Story img Loader