नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांनी भुजबळ पिता-पुत्रांविषयी केलेल्या अनुचित उद्गारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांनी गुरुवारी दिलेल्या मनमाड बंदच्या हाकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठेतील दुकाने बंद होती. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून हिरेंवर टीकास्त्र सोडण्यात आले.
पाणीवाटपासाठीच्या टँकरच्या उद्घाटनासाठी बुधवारी मनमाडला आलेले जिल्हा बँक अध्यक्ष व जनराज्य पक्षाचे नेते अद्वय हिरे यांनी एकात्मता चौकात प्रक्षोभक भाषण केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक व कार्यकर्ते संतापले. याच ठिकाणी हिरेंच्या वाहनासमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करत शिवीगाळही केली. पोलिसांना बळाचा वापर करून स्थितीवर नियंत्रण मिळवावे लागले. त्यानंतर या प्रक्षोभक भाषणावरून अद्वय हिरे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजक अ‍ॅड. सुभाष डमरे व माजी नगरसेवक नंदू माळी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. भाषणात हिरेंनी भुजबळ पिता-पुत्रांवर अतिशय जहरी शब्दात टीका केली. येवला, नांदगाव व मनमाडचे कोणतेही प्रश्न भुजबळांनी सोडविले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रक्षोभक भाषणाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. मध्यरात्रीच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांनी हिरे यांच्या भाषणाच्या निषेधार्थ मनमाड बंदची हाक दिली. बंदमध्ये व्यावसायिक व नागरिकांनी सहभागी व्हावे, याकरिता पालिका गटनेते बब्बू कुरेशी, नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, बबलू पाटील आदींनी शहरात फिरून आवाहन केले. बंदला सकाळी शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद होती. नगराध्यक्ष पगारे यांनी अद्वय हिरे यांनी भुजबळ कुटुंबीयांविषयी टीका यापुढे थांबवावी; अन्यथा यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. हिरे यांना त्यांच्या मतदारसंघातून जनतेने हद्दपार केले आहे, त्याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Story img Loader