शहरात महावितरणच्या वतीने सुरू असलेल्या अन्यायकारक भारनियमनामुळे शहरातील व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आल्याने शहर हे कायमस्वरूपी भारनियमनमुक्त करावे, या मागणीसाठी शहर व्यापारी महासंघाने शुक्रवारी पुकारलेल्या ‘मनमाड बंद’मुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला. व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना आल्या पावली परतावे लागले.
भारनियमन बंद झालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सर्व स्तरांतील व्यापाऱ्यांसह विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेत धरणे आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत शहरातील रात्रीचे भारनियमन बंद करावे, यापुढे व्यापारी अन्याय सहन करणार नाहीत, अशी भूमिका महासंघाने घेतली. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले. शहरातील विजेची थकबाकी आणि चोरी थांबविण्यासाठी महावितरणने कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून शहरात सुरू होत आहे. चुकीच्या वीज देयकांची दुरुस्ती मोहीम, थकबाकी वसुलीसाठी पथक तैनात करण्यात आले आहे. वीजचोरीच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. घरांतील मीटर घराबाहेर बसविण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच तक्रार निवारणासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या सर्व कृती योजनेमुळे तीन ते चार
महिन्यांत मनमाड शहर भारनियमनमुक्त होईल, असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिले, परंतु या स्पष्टीकरणावर आंदोलकांचे कोणतेही समाधान न झाल्याने अधिकारी आल्या पावली परत गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा