शहराला सध्या सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी सातत्याने वीजपुरवठा खंडित राहात असल्याने पाणीपुरवठय़ाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ महावितरणच्या गलथान कारभारामुळे होत आहे. मनमाडकरांनी कोणत्याही अपप्रचारांवर, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात तीन ते चार वर्षांपासून पाऊस झालेला नाही. तरीही पालखेड कालव्याच्या आवर्तनाच्या पाण्यावर सुमारे ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जून २०१५ पर्यंत पुरेल असे नियोजन करून शहराला सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु सध्याचे बदलते वातावरण, वादळी वारे आणि पावसामुळे वीजपुरवठा सतत खंडित केला जात आहे. याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.
२८ मार्चला रात्री आठ ते सकाळी १० वाजेपर्यंत तसेच २९ मार्चला सायंकाळी साडेसहा ते ३० मार्चच्या सकाळी १० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे सात दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या वेळेत वाढ झाली आहे. ऐन उन्हाळ्यात अशी स्थिती उद्भवण्यामागे महावितरणचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मनमाडकरांचा रोष उद्भवू नये म्हणून नगराध्यक्षांनी त्वरित आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कित्येक वर्षांपासून मनमाडकरांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोणीही आवाहन न करताही मनमाडकरांना पाणी जपून वापरण्याची सवय झाली आहे. एकेका थेंबाचे महत्त्व काय आहे हे ते जाणून आहेत.
मागील वर्ष मात्र मनमाडकरांना काहीसे बरे गेले. १० ते १५ दिवसाआड होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सात दिवसांपर्यंत आला. परंतु त्यातही आता असे अडथळे येऊ लागल्याने मनमाडकरांमध्ये नाराजी आहे. नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना सात दिवसाआड पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
मनमाडमध्ये पुन्हा ‘पाणी’ प्रश्न
शहराला सध्या सात दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी सातत्याने वीजपुरवठा खंडित राहात असल्याने पाणीपुरवठय़ाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.
First published on: 01-04-2015 at 07:57 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmad face severe water problem