नाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मागील आठवडय़ात रंगलेली राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धा जशी सर्वागसुंदर आयोजनासाठी लक्षात राहील तशी ती क्रीडा रसिकांच्या अल्प प्रतिसादामुळेही. नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेकडे नाशिककरांनी पाठ फिरविण्याचे कारण शोधूनही सापडत नसल्याने निराश झालेल्या आयोजकांना उभारी देण्याचे काम मनमाड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेने केले आहे. नाशिक येथील क्रीडा प्रेमींच्या अल्प उपस्थितीच्या पाश्र्वभूमीवर मनमाडच्या स्पर्धेस कितपत प्रतिसाद मिळतो, याविषयी सर्वानाच उत्सुकता होती. मनमाडकरांनी कोणाचीच निराशा केली नाही. क्रीडाप्रेमींच्या गर्दीने नेहरू भवन अक्षरश: ओसंडून वाहात होते. म्हणजेच नाशिकच्या स्पर्धेत आढळलेली एकमेव कमतरताही मनमाडच्या स्पर्धेने दूर केली.
अवघ्या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय दोन स्पर्धाचे तेही सरकारी पध्दतीने दिमाखदार आयोजन करणे म्हणजे साधी गोष्ट नव्हे! अर्थात त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेले कष्ट कारणीभूत आहेत. मनमाडच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेचे वेगळेपण अनेक बाबतीत सांगता येईल. मनमाडकरांनी दिलेला उदंड प्रतिसाद, नाशिक विभागाकडून प्रतिनिधीत्व करणाऱ्या मनमाडच्या खेळाडूंची दर्जेदार कामगिरी, यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. क्रीडा स्पर्धेला मनमाडमध्ये कायमच प्रतिसाद मिळत आला आहे. कबड्डी, कुस्ती आणि शरीरसौष्ठव या खेळांसाटी मनमाडची विशेष ओळख. त्यामुळे या तीन क्रीडा प्रकारांची कोणतीही स्पर्धा असो, मनमाडला गर्दी होणारच. मनमाडचे हे क्रीडाप्रेमच वेटलिफ्टिंग स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरले. स्पर्धकांची निवास व्यवस्था गुरूव्दारात करण्यात आली होती. खेळाडूंना पदकांसह रोख पारितोषिकेही देण्यात आली. कोल्हापूर, पुणे आणि यजमान नाशिक विभागाचे या स्पर्धेवर वर्चस्व दिसून आले. या स्पर्धेत ३० गटांमध्ये एकूण २०४ खेळाडूंनी आपले कसब पणाला लावले. नाशिक विभागातून १४ मुली आणि आठ मुलांनी भाग घेतला. पुणे, मुंबई या महानगरांच्या आणि कुस्तीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या तुलनेत नाशिक विभागाची कामगिरी निश्चितच सर्वार्थाने उल्लेखनीय म्हणावी लागेल. अद्यापही नाशिक जिल्ह्यातील बहुतेक शाळांमध्ये वेटलिफ्टिंगचा गंधही नाही. नाशिकमधील पेठे विद्यालयासह काही शाळांनी ‘ऑलिम्पिक बार’ ची खरेदी केली होती. परंतु नंतर ते दुर्लक्षित झाले. ग्रामीण भागात तर साहित्यापासून वानवा असल्याचे दिसते. अर्थात मनमाडचा अपवाद.
नाशिक विभागाने या स्पर्धेत तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य, याप्रमाणे ११ पदकांची कमाई केली. नाशिक विभागात मनमाडचा दबदबा किती आहे ते यावरूनच दिसून येईल की, तीन सुवर्णापैकी दोन सुवर्ण, पाचही रौप्य आणि एक कांस्य असा त्यांचा वाटा आहे. श्रध्दा माळवतकर व कल्याणी खैरनार यांनी सुवर्ण तर खुशाल चौधरी, मोनिका कडनोर, नीलम शेळके, ऐश्वर्या आवारे, सोनाली काळसर्प यांनी रौप्य आणि प्राजक्ता वेताळने कांस्य मिळविले. नाशिक विभागीय संघातील १४ पैकी ११ मुली एकटय़ा मनमाडच्या होत्या. ही बाब मनमाडची दादागिरी दाखविण्यासाठी पुरेशी ठरावी. याचे श्रेय जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रविण व्यवहारे यांच्याकडे बहुतांश प्रमाणात जाते. वेटलिफ्टिंगसारख्या खेळाकडे मुलींना वळविणे ही कठीण गोष्ट. परंतु पालकांचे समूपदेशन करून त्यांनी त्यांचे मन वळविले. स्वत: क्रीडा शिक्षक असलेल्या व्यवहारे यांनी खेळाडू घडविण्यासाठी घेतलेले कष्ट, केलेले प्रयत्न या सर्वाचे फलित आज दिसत आहे. त्यामुळेच नाशिकचे वेटलिफ्टिंग मनमाडपुरतेच मर्यादित आहे की काय, असेही वाटू लागते. ही मर्यादा ओलांडण्यासाठी जिल्हा संघटनेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.                    (ं५्रूंस्र्स्र्ं३्र’@ॠें्र’.ूे)