अनेक वर्षांपासून प्रलंबित मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास अखेर सुरुवात झाली आहे. रेल्वे बोर्डाच्या समितीमार्फत मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गासाठी जागा, येणारे अडथळे, अडचणीची माहिती सर्वेक्षणात संकलित केली जात असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा-शिरपूर-सेंधवा-धामनोद-महू-इंदूर हा रेल्वेमार्ग केवळ रेल्वेच्याच फायद्याचा नाही तर सर्वासाठी उपयुक्त ठरणार आहे. मनमाड ते थेट इंदूपर्यंतच्या या प्रस्तावित रेल्वेमार्गावर अल्पसंख्याक मुस्लीमबांधवांची संख्या मोठी आहे. या मार्गाचा वापर मुस्लीमबांधवांना अजमेर शरीफ दग्र्यावर जाण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय, या मार्गावर यंत्रमागचा मोठा व्यवसाय असून व्यावसायिकांना माल वाहतुकीचे स्वस्त साधन उपलब्ध होऊ शकते. याच रेल्वे मार्गावरील शिरपूर ते महूपर्यंतचा सुमारे १४० ते १५० किलोमीटरचा पट्टा आदिवासी बहुसंख्य वस्ती असलेला आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू हे शहर आहे. तसेच डॉ. आंबेडकर यांनी हजारो दलितबांधवांसह बुद्ध धर्माची दीक्षा घेतली ती नागपूर येथील धम्मभूमी या रेल्वेमार्गास संलग्न आहे. यामुळे देशभरातील प्रामुख्याने हा नियोजित रेल्वेमार्ग सर्वाना उपयोगी ठरणारा आहे. एका पाहणीनुसार मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग हा वाहतुकीसाठी उत्तम साधन ठरणार आहे. कारण, सेंधवा-धामणोद या मध्य प्रदेशातील भागात तसेच संलग्न असलेल्या नाशिक जिल्ह्य़ात दररोज हजारो मालमोटारींमधून माल पाठविला जातो. तोच माल जर रेल्वेने नेला-आणला गेला तर वाहतूक अतिशय स्वस्तात होऊ शकते. नाशिक जिल्ह्य़ात द्राक्ष, कांदा व डाळिंबाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होते तर जळगाव व धुळे जिल्ह्य़ात केळीचे उत्पादन होते. केळीला उत्तर भारतात मोठी मागणी आहे. कापसाचे उत्पादनही या भागात मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. पण, कापड उद्योगाची मुख्य बाजारपेठ मुंबई, सूरत, अहमदाबाद व बंगलुरू अशा ठिकाणी आहे. या रेल्वेमार्गाद्वारे या बाजारपेठेत जाण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेल्या या रेल्वेमार्गाची रेल्वे अंदाजपत्रकात तत्कालीन रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी घोषणा केली होती. मालेगाव-इंदूर या रेल्वेमार्गावर सुमारे १६०० कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. खर्चाच्या काही टक्के हिस्सा महाराष्ट्र शासन उचलणार आहे. मनमाड-इंदूर मार्गाचे आठ समिती सदस्य सर्वेक्षण करीत आहे.