नगराध्यक्षपदासाठी पालिकेतील सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे तर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख तथा पालिकेतील गटनेते संतोष बळीद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नऊ नोव्हेंबर रोजी निवडणूक अटळ ठरली आहे.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार पगारे यांनी आ. पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत सोमवारी अर्ज दाखल केला. तर बळीद यांनी शिवसेना नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत अर्ज दाखल केला. पगारे यांनी दोन, तर बळीद यांनी एक असे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मागील वर्षी नगरपालिकेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीनेअपक्ष राजेंद्र अहिरे यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. त्यांचा दहा महिन्यांचा कार्यकाल संपल्यानंतर आवर्तन पद्धतीनुसार मागील सप्ताहात त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या. सत्तारूढ आघाडीतर्फे राजेंद्र पगारे, गणेश धात्रक, बबलूभाई पाटील हे नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते. पालिकेतील सत्तारूढ आघाडीतर्फे अखेर नगराध्यक्षपदासाठी पगारे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पालिकेतील विरोधक शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख तथा पालिकेतील गटनेते संतोष बळीद यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. नगरसेवक प्रवीण नाईक व अमिन पटेल हे त्यांचे सूचक आणि अनुमोदक आहेत. साहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जाची छाननी होऊन तीनही उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले. अर्ज माघारीची मुदत आठ नोव्हेंबर आहे. तर, नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. शहराची सध्याची परिस्थिती, विविध समस्या आणि विकासकामे ही परिस्थिती हाताळण्यासाठी अनुभवी उमेदवाराची गरज असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

Story img Loader