शहरातील भाग एक आणि भाग दोनमध्ये होणारे भारनियमन आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे मनमाडकर त्रस्त झाले असून या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.
अन्यायकारक भारनियमनामुळे मनमाडकर वैतागले असतानाच अलीकडे भारनियमनाव्यतिरिक्त भाग १ आणि भाग २मध्ये सातत्याने अचानक वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. प्रामुख्याने तासाभरात चार ते पाच वेळेस अचानक वीजपुरवठा खंडित होत आहे. भाग एकमध्ये तर भारनियमनाव्यतिरिक्त सलग आठ ते दहा वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत आहे. संगणकावर काम करत असताना अचानक वीज खंडित झाल्यास केलेले पूर्ण काम वाया जाते. महावितरणने याबाबत तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
वीजपुरवठा खंडित होत असल्याने मनमाडकर हैराण झाले असतानाच विस्कळीत वाहतुकीलाही त्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील वाहनधारकांना पोलीस प्रशासनाचा कोणताच धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे. रिक्षा किंवा मोटरसायकल रस्त्यात कुठेही उभी करून रस्ता अडविला जातो. त्यामुळे वाहतूक कोंडी होणे हे नित्याचे झाले आहे. रिक्षा कुठेही उभी करून प्रवासी भरले जातात. मोटरसायकलीवर तिघांनी प्रवास करणे हा जणूकाही येथील नियमच झाला आहे. गर्दीतूनही मोटरसायकल सुसाट पळविली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तुफान चौक, एकात्मता चौक, इंडियन हायस्कूल, सराफ बाजार, सुभाष रोड, जुने भाजी मार्केट रोड या ठिकाणी सायंकाळी गर्दी असते. फेरीवाले रस्त्यातच ठाण मांडून व्यवसाय करीत असतात. या समस्येवर उपाय म्हणून शहरातील मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करावेत, वाहनतळ तयार करावेत अशी मागणी रिपाइंचे संपर्क प्रमुख राजाभाऊ अहिरे आणि कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा