दिवाळीच्या सुट्टीनंतर प्रवासी व चाकरमाने पुन्हा मुंबईला परतत असून त्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकात सध्या मोठी गर्दी उसळली आहे. नेमक्या त्याचवेळी मंगला एक्स्प्रेसला घोटीजवळ झालेल्या अपघाताने मनमाड-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रेल्वे प्रशासनाने अनेक गाडय़ा रद्द केल्या तर काही गाडय़ांचे मनमाडहून मार्ग बदलले. या घडामोडीमुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मनमाड, जळगाव आदी रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची अवस्था बिकट झाली.
एकटय़ा मनमाड स्थानकावर सुमारे २० हजार प्रवासी अडकले. त्यात शिर्डी येथे जाऊन आलेल्या व जाणाऱ्या साईभक्तांचाही समावेश होता. सर्वच प्रवाशांची आरक्षणे रद्द झाली. वाहतूक कधी पूर्ववत होईल याची अधिकृत सूचना देण्यात येत नव्हती. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळात व गैरसोयीत भर पडली. नंतर रेल्वेने विशेष माहिती कक्ष सुरू केला. रेल्वेगाडय़ांच्या चलस्थितीबाबत माहिती देणाऱ्या फलकावर भलताच संदेश झळकत असल्याने गोंधळात आणखी भर पडली. नाशिकरोड स्थानकात वेगळी स्थिती नव्हती.
सर्व गाडय़ा रद्द झाल्यामुळे दुपारनंतर या स्थानकात शुकशुकाट पसरला होता.  मनमाड रेल्वे स्थानकावर पुढील प्रवासाची तिकीटे रद्द करून परतावा देण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे तिकीट खिडक्यांसमोर भल्या मोठय़ा रांगा लागल्या.
मुख्य म्हणजे, प्रवाशांची चूक नसताना १५ रूपये रद्दीकरण शुल्क कपात केले जात असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. काही जागरूक प्रवाशांनी रेल्वेच्या वरिष्ठांकडेही तक्रारी केल्या. मंगला एक्स्प्रेस घसरल्याने मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

Story img Loader