मागील अठरा दिवसांपासून मनमाड शहरातील पथदीपांची जोडणी थकबाकीमुळे महावितरणने खंडित केल्यामुळे धोक्यात आलेली शहरातील कायदा व सुव्यवस्था, शहरातील ढासळलेली आरोग्य व पाणी पुरवठा यंत्रणा याच्या निषेधार्थ नगरपालिका प्रशासन व मुख्याधिकारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची शहरातून सवाद्य मिरवणूक काढून संतप्त शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्याचे दहन केले. मनमाड नगरपालिका इमारतीसमोर शेकडो नागरीक, कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली. काही काळ आंदोलकांनी रास्तारोकोही केला.
शहरातील सर्वच वॉर्डातील ४,५०० पथदीपांचे दोन वर्षांपासून दोन कोटी १९ लाख रुपयांच्या थकीत बाकीमुळे महावितरणने जोडणी खंडित केली आहे. त्यानंतर पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी नियमानुसार पैसे भरून ते सुरू करण्यासाठी कोणतीही सकारात्मक हालचाल न केल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संतप्त वातावरण आहे. जनतेतील या असंतोषाचा धागा पकडून शिवसेना, भाजप व रिपाइं (आठवले गट) व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी एकात्मता चौकात केलेल्या या आंदोलनात नागरीक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सजविलेल्या गाठवावरुन मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा बसविण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात भगवे, निळे झेंडे घेऊन आंदोलक मिरवणुकीत सहभागी झाले. एकात्मता चौकात जुन्या नगरपालिकेसमोर आंदोलकांनी निदर्शने व रास्तारोको केला. मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. मनमाड नगरपालिकेच्या ढिसाळ व अकार्यक्षम कारभारामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून आरोग्य, पाणी पुरवठय़ाच्या प्रश्नामुळे असंतोष खदखदत आहे. या परिस्थितीला प्रामुख्याने मुख्याधिकारी जबाबदार असून त्यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी व महसूल अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
धुळे शहरावर पाणी पुरवठा खंडित होण्याचे सावट
पाणीपट्टीची महापालिकेने थकविलेली तब्बल अडीच कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यास धुळ्याचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. वारंवार सूचना देऊनही महापालिका थकबाकी भरत नसल्याने पाटबंधारे विभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवायची असल्यास महापालिकेला थकीत रकमेतील काही ना काही रक्कम भरणे क्रमप्राप्त झाले आहे. थकबाकीमुळे नकाणे तलावाच्या दरवाजांची दुरूस्तीही पाटबंधारे विभागाने रोखली आहे. या कामासाठी चार महिन्यांपूर्वी एक कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला असून त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला गेलेला नाही. नकाणे तलाव, तापी, अक्कलपाडा, हरणमाळ, पांझरा व मालनगाव धरणातून पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्या संदर्भात पाटबंधारे विभागाची महापालिका प्रशासनाकडे दोन कोटी ६७ लाख रुपये अशी चालू आणि मागील वर्षांची मिळून पाणीपट्टी थकीत आहे. ही थकीत पाणीपट्टीची रक्कम महापालिका प्रशासनाने मुदतीत न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पथदीप बंद असल्याने पालिकेविरोधात मनमाडकर आक्रमक
मागील अठरा दिवसांपासून मनमाड शहरातील पथदीपांची जोडणी थकबाकीमुळे महावितरणने खंडित केल्यामुळे धोक्यात आलेली शहरातील कायदा व सुव्यवस्था
First published on: 11-02-2014 at 07:40 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmad residentals get aggressive on road lights issue