पाण्यासाठी तहानलेली जनता पाणी द्या, असा टाहो फोडत आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलन करीत असेल तर यात कसले आले राजकारण ? भुजबळ पितापुत्रांनी अपेक्षाभंग केल्यामुळे आज सर्वसामान्य नागरीक त्यांच्या विरोधात असंतोष व्यक्त करीत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ही वेळ का आली, याचे भुजबळ पिता-पुत्रांनीच आत्मपरीक्षण करावे, असे खडे बोल सुनावत मनमाड बचाओ संघर्ष समितीने जनतेने पाण्यासाठीच्या आंदोलनात सक्रीयपणे सहयोग द्यावा, असे आवाहन केले आहे. या निमित्ताने भुजबळांविरोधातील असंतोष उफाळून आल्याचे स्पष्ट झाले असून पालकमंत्र्यांनी मनमाडचे पालकत्व स्वीकारण्याऐवजी मनमाडकरांवर दोषारोप केल्याची ही परिणती असल्याचे बोलले जात आहे. मनमाडकर पाण्याविना चडफडत असताना पालकमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याऐवजी उलट मनमाडकारांना पाणी कसे वापरावे याविषयी नुकतेच एका जाहीर सभेत डोस दिला होता. त्या विधानाचे पडसाद येथे आयोजित जाहीर सभेत उमटले. सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भुजबळांवर आगपाखड करत शरसंधान साधले.
येथील एकात्मता चौकात बुधवारी रात्री प्रमुख विरोधी पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची जाहीर सभा माजी नगराध्यक्ष छबुशेठ शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मनमाड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पालखेडचे रोटेशन येत्या २८ फेब्रुवारीपूर्वी मिळावे, या मागणीसाठी २५ तारखेला ‘आययुडीपी’मधील नवीन नगरपालिका कार्यालयास दिवसभर घेराव तर २७ तारखेला मालेगाव रोडवर रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा निर्धार यावेळी एकमुखाने करण्यात आला. मनमाड शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला असून शहरातील प्रमुख भागात महिनाभरापासून नगरपालिकेच्या नळाव्दारे पिण्याचे पाणी आलेले नाही. नियोजित वेळेप्रमाणे १० मार्चला पालखेडचे रोटेशन सुटले तर १५ मार्चला पाणी मनमाडला येईल, मनमाडचा नळांना त्यानंतर पाणी येणार आहे. या भीषण परिस्थितीत पालखेडचे रोटेशन किमान १० दिवस लवकर सोडणे हा एकमेव पर्याय उरला आहे, त्यासाठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन घेराव व रास्ता रोकोचे आंदोलन तीव्र केले जाईल, असे कृती समितीतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळवंत आव्हाड यांनी जाहीर केले.
संघर्ष समितीच्या यापुढील आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी शहरातील विविध भागात शुक्रवारपासून चौकसभा व प्रचार फे ऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या संघर्षांत शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष रहेमान शाह यांनी केले. मनमाडचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी ओझरखेड, दरसवाडी, रायपूर, वाघदर्डी ही पंपिंग व विजेचा खर्च नसलेल्या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी समितीने यापुढे पाठपुरावा करण्याचा निर्धार अशोक परदेशी यांनी व्यक्त केला. सभेत एस. एम. भाले, सलीम सोनावाला, नितीन पांडे, अॅड. रमण संकलेचा आदींसह विविध राजकीय पक्ष संघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ यांच्याविरुद्ध उपस्थित वक्त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. भुजबळांनी पाण्याच्या प्रश्नावर शहरात राजकारण सुरू असल्याचा जाहीर आरोप केला होता. या विधानावर अनेकांनी ‘आम्ही फक्त पाणी मागत आहोत, यात कसले आले राजकारण ? असा सवाल उपस्थित केला. या उलट भुजबळांनीच पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करीत पंकज भुजबळांना आमदार म्हणून निवडून द्या, तुम्हाला दोन वर्षांत पाणी देतो असे सांगत तमाम मनमाडकरांची मते मिळविली आणि त्या जोरावर पंकज भुजबळांना येथून निवडून आणले. हे राजकारण भुजबळच खेळले, असा आरोपही अनेकांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा