जिल्ह्यातील मनमाड आणि येवला नगराध्यक्षपद आपल्याकडे कायम राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळविले असून दोन्ही ठिकाणी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे. मनमाड नगराध्यक्षपदी योगेश पाटील तर येवला नगराध्यक्षपदी शबाना शेख यांच्या बिनविरोध निवडीवर १९ जुलै रोजी शिक्कामोर्तब होईल.
मनमाडमध्ये योगेश पाटील यांनी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, राजाभाऊ अहिरे, साईनाथ गिडगे, गणेश धात्रक, बाळासाहेब पाटील यांच्यासह प्रमुख नगरसेवकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालिका मुख्याधिकारी संजय केदार यांच्याकडे सादर केला. विरोधी शिवसेनेतर्फे कोणीही अर्ज दाखल केला नाही. पाऊस नसल्याने व आरोग्य सेवा ढासळल्याने जनतेच्या प्रश्नांबरोबर आम्ही असून या निवडणुकीवर आमचा बहिष्कार असल्याचे पत्रक शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी प्रसिद्धीस दिले आहे. पाटील यांच्या पहिल्या अर्जावर सूचक म्हणून राजेंद्र अहिरे तर अनुमोदक म्हणून प्रमोद पाचोरकर तर दुसऱ्यावर सूचक म्हणून सचिन दराडे व अनुमोदक म्हणून रवींद्र घोडेस्वार या नगरसेवकांची स्वाक्षरी आहे. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष अफजलभाई शेख, गटनेते मुश्ताक कुरैशी, महेंद्र शिरसाठ, सादिक तांबोळी आदीसह नगरसेवक व समर्थक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी आ. पंकज भुजबळ यांच्या रामकुंज बंगल्यावर पालिकेतील सत्तारुढ शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीत पाटील यांनी उमेदवार अर्ज सादर करण्यासंदर्भात भुजबळ यांनी सूचना मांडली. त्याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मावळते नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी आपल्याला ठरल्याप्रमाणे १० महिन्यांचा कार्यकाल पूर्ण करण्यासाठी अजून दोन महिने मुदतवाढ देण्याची बाजू मांडली. परंतु आगामी काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेता येणार नसल्याचे लक्षात घेत धात्रक यांची समजूत काढण्यात आली. पालिकेतील २९ नगरसेवकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीचे २२ नगरसेवक असून विरोधी शिवसेनेचे सात जण आहेत.
दुपारी दोन वाजता पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपदासाठी त्यांची निवड निश्चित असल्याचे मानत समर्थकांनी जुन्या नगरपालिका इमारतीसमोर फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव सादरा केला. पाटील हे मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक व काँग्रेसचे प्रांतिक सदस्य, माजी नगराध्यक्ष दिलीप पाटील यांचे पुत्र असून राष्ट्रवादी काँग्रसचे कार्यकर्ते आहेत.
दुसरीकडे, येवला पालिकेत अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत राष्ट्रवादीकडून शबाना शेख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
पालिकेत २३ नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी १६ अपक्ष २ आणि एक काँग्रेस, भाजप २ शिवसेना १ असे बलाबल आहे. पैकी राष्ट्रवादी आघाडीचे १९ जण आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व या मतदार संघातील सर्व संस्थांवर आहे. ओबीसी आणि आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदी जयश्री लोणारी, गिता परदेशी यापैकी कोणाची वर्णी लागेल हे ठरविण्यासाठी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. शबाना शेख यांच्या बाजूने नेत्यांनी कौल दिला. रमजान महिना असल्याने शबाना शेख यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याची विनंती काही नेते व नगरसेवकांनी केली होती. त्यांच्या विनंतीचा मान राखत शेख यांना संधी देण्यात आल्याचे म्हटले जाते. शबाना शेख यांची निवड निश्चित झाल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी वासंती माळी, मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी काम बघितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा