नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थासाठी रेल्वेने मनमाड येथे देशभरातून भाविक येत असतात. त्यांच्यासाठी फिरते स्वच्छतागृह, शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती तसेच मजबुतीकरण, पथदिवे इत्यादी प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता २९ कोटी ५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सिंहस्थ कृती आराखडय़ात समाविष्ट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधितांना दिले.
आ. पंकज भुजबळ यांनी सिंहस्थ पर्वणी कालावधीत मनमाड शहरात भाविकांना प्राथमिक स्वरूपाच्या सोयी-सुविधा पुरविण्यासंबंधात शिष्टमंडळासह मुख्यमंत्री, वित्तमंत्री व पालकमंत्री यांची भेट घेतली. पर्वणीसाठी देशभरातील हजारो भाविक रेल्वेने मनमाड येथे उतरतात व पुढे रस्तामार्गे नाशिक, त्र्यंबकेश्वरला जातात. या कालावधीत मनमाडमध्ये भाविकांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढतो. त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याचा आर्थिक भार मनमाड परिषदेस उचलणे आवश्यक आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीकरिता मनमाडमध्ये फिरती स्वच्छतागृहे, शौचालये, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण, पथदिवे, सांडपाणी व्यवस्था व गटारांची दुरुस्ती, भाविकांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तसेच वाहने उभी करण्यासाठी मोकळ्या जागा संरक्षित करणे, इत्यादी कामे आवश्यक आहेत.
या दृष्टीने २९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, त्याचा समावेश राज्य व केंद्र शासनाच्या सिंहस्थ पर्वणी २०१४ च्या विकास प्रारूप आराखडय़ात करण्यात यावा, अशी विनंती आ. भुजबळ यांनी केली.       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा