शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसनिकांकडून झालेल्या अपमानानंतर अज्ञातवासात गेलेले मनोहर जोशी आणखी काही दिवस दादरपासून लांब राहण्याची शक्यता आहे. दादरमध्ये आज म्हणजे गुरुवारी होणाऱ्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती घोषित करण्यात आली होती, मात्र दसरा मेळाव्यातील या प्रसंगानंतर नव्याने पाठविण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून जोशींचे नाव वगळण्यात आले आहे.
‘सारेगम’ फेम ऊर्मिला धनगर हिने गायलेल्या व ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’ची प्रस्तुती असलेल्या ‘गंध मातीचा’ या नव्या ध्वनिफितीचे प्रकाशन दादरमधील स्वा. सावरकर स्मारकाच्या सभागृहात गुरुवारी रात्री आठ वाजता होत आहे. या वेळी यातील गीतेही सादर केली जाणार आहेत. शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रकाशन होणार आहे, तसेच ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव, अशोक हेही या वेळी उपस्थित असतील, असे प्रसारमाध्यमांना प्रथम कळविण्यात आले होते. मात्र शिवसेनेतील मानापमान नाटय़ानंतर मनोहर जोशी हे अज्ञातवासात गेल्याने काही तासांतच या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका नव्याने धाडण्यात आल्या. या नव्या निमंत्रण पत्रिकेतून जोशींचे नाव कमी करण्यात आल्याचे दिसून आले. निमंत्रण पत्रिकेतील या बदलामुळे जोशी हे आणखी काही दिवस दादरपासून दूर राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Story img Loader