पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रणित ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानुसार, शहरातील अनेक कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये आज शासकीय सुटीच्या दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानाच्या निमित्ताने अनेक संस्थांनी आपापल्या परिसराची सफाई केली असली तरी प्रत्यक्षात तो केवळ एक सरकारी सोपस्कार म्हणून आज गांधी जयंतीला सफाईचा मोदी उत्सव साजरा केला गेला. या निमित्ताने ठिकठिकाणी अधिकारी,  कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी हातात झाडू घेऊन आपापली छायाचित्रे काढून घेत हा सफाई उत्सव साजरा करीत असल्याचे दिसून आले.
गांधी जयंतीच्या पर्वावर ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याचे परिपत्रक सर्व सरकारी कार्यालये, रेल्वे, संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क कार्यालय, केंद्रीय कार्यालय परिसर, शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचल्याने आज सुटीच्या दिवशीही अनेक कार्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये वर्दळ होती. केंद्र सरकारच्या  कार्यालयांमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन आपापली कार्यालये आणि परिसराची स्वच्छता केली. किंबहुना, कार्यालयांमधील जुने दस्तऐवज व तत्सम इतर बाबींची साफसफाई करण्याचे आदेश अगोदरच म्हणजे, २५ सप्टेंबरच्या सुमारासच पोहोचले होते व त्यानुसार अनेक कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली होती. त्यामुळे कित्येक ठिकाणी स्वच्छतेच्या नावाखाली केवळ छायाचित्र काढण्यापुरता अनेकांनी झाडू हाती घेतला.  
शाळा व महाविद्यालयांमध्येही ही मोहीम राबवण्याचे सरकारी आदेश असल्याने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने शाळांमध्ये स्च्छता मोहीम अधिक चांगल्या प्रकारे राबविली गेली असली तरी महाविद्यालयीन स्तरावर मात्र केंद्र सरकारच्या आवाहनाला तितकेसे गांभीर्याने घेतले गेले नसल्याचे आढळून आले. प्रत्यक्ष स्वच्छता करणे अपेक्षित असताना अनेक महाविद्यालयांनी चौकाचौकांतून, तसेच सार्वजनिक ठिकाणी जाणीव जागृती करणारे उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले.  
वसंतराव नाईक स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या विद्यार्थ्यांनी झिरो माईल परिसरात सफाई अभियान राबविले. ज्येष्ठ नागरिक संघ, इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकांऊंटटस्, राष्ट्रीय सेवा योजनेची पथके त्याचप्रमाणे इतर अनेक संस्थांनी विविध परिसरांची सफाई करून आजचे अभियान राबविले.
विक्रीत ५० टक्क्यांनी वाढ
स्वच्छ भारत अभियानामुळे नागपूर शहराच्या स्वच्छतेच्या परिस्थितीत कितपत फरक पडेल, हा भाग अलाहिदा. मात्र, या मोहिमेचा परिणाम म्हणून शहरातील झाडू विक्रीत मात्र सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. खास स्वच्छता अभियानासाठी झाडू हवे असल्याचे सांगत अनेक कार्यालयांनी गेल्या २-३ दिवसात मोठय़ा प्रमाणात झाडू खरेदी केली असल्याचे आढळून आले.
केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांकरिता हे अभियान बंधनकारक केले गेल्यामुळे विविध कार्यालयांनी विशेषत्वाने झाडू खरेदी केली आहे. बरोबर गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे, २ ऑकटोबरला झाडू हवे असल्याचे सांगत या कार्यालयांनी ठोक झाडू विक्रेत्यांकडे अगोदरच आपापल्या गरजेनुसार म्‘ऑर्डर्स बुक’ केल्या होत्या. अनेक कार्यालयांमध्ये खरेदीची रककम काही हजारांमध्ये असल्याचेही निदर्शनास आले आहे. ‘या मोहिमेमुळे दर दिवशीच्या झाडू खरेदीत नेहमीपेक्षा ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेक सरकारी कार्यालयांनी गेल्या २-३ दिवसात ही खरेदी केली.’ असे झाडू उत्पादक गुंजन बटाविया यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.