एसटीत सध्या चालकांची मोठी कमतरता आहे. महामंडळात तब्बल २९६४ चालक कमी आहेत. मात्र प्रशासनाने फक्त कोकण विभागातील चालकांच्या भरतीला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यातच भरतीसाठी प्रशासन किमान अट १० वी उत्तीर्ण ही ठेवू पाहात आहे तर कर्मचारी संघटना मात्र ती ८ वी उत्तीर्ण अशी ठेवण्यासाठी हटून बसल्या आहेत. भरती प्रक्रियेसाठी आधी नेमलेल्या ‘एमकेसीएल’ या निमसरकारी एजन्सीऐवजी ‘सिग्मा टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी एजन्सीला कंत्राट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ही एजन्सी व प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सध्या ही भरती प्रक्रिया दिवसेंदिवस लांबणीवर पडत असल्याचेही समजते.
चालकांच्या कमतरतेमुळे एसटी महामंडळ मुंबई प्रदेशासाठी म्हणजेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच विभागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याच्या विचारात आहे. या पाच विभागांसाठी १५०० चालकांची पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी दहावी पास हीच शैक्षणिक अट ठेवण्यात येणार असल्याचे एसटीतील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र या अटीला कामगार संघटनांचा तीव्र विरोध आहे. चालक पदासाठी आठवी पास हीच शैक्षणिक अट असावी, असा पवित्रा या संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत हा वादाचा मुद्दा ठरणार आहे.
चालकांच्या भरतीची प्रक्रिया ऑनलाइन राबवली जाणार असल्याने त्यासाठी खासगी एजन्सीला कंत्राट दिले आहे. हे कंत्राट एमकेसीएल या आधीच्या एजन्सीऐवजी सिग्मा टेक इंडिया प्रायव्हेट लि. या एजन्सीला दिले आहे. मात्र ही एजन्सी आणि एसटी प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे एसटीतील काही अधिकारीच खासगीत मान्य करतात. भरती प्रक्रिया कशी राबवली जावी, त्यासाठी परीक्षा कशी घ्यावी, उमेदवारांच्या निवडीचे निकष काय असावेत, याबाबत अद्याप उभय पक्षांमध्ये कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. भरतीबाबतची जाहिरात तयार असली, तरी हा निर्णय झाल्याशिवाय भरती प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
याबाबत एसटीच्या कर्मचारी वर्ग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आर. आर. पाटील यांना विचारले असता, भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र या प्रक्रियेला विलंब होत आहे अथवा नाही, याबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

Story img Loader