जिल्ह्य़ातील खारपाणपट्टय़ातील जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात अनेक गावातील क्षारयुक्त पाणी नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. सातपुडा खोऱ्यात व पूर्णेच्या पाणलोट क्षेत्रालगतच्या या गावांमध्ये गेल्या तीन वर्षांत क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी व पोटाच्या दुर्धर आजाराचे शंभराहून अधिक बळी गेले आहेत. हजारो लोक या विकारांनी त्रस्त आहेत. यासाठी आवश्यक शुध्द पाणीपुरवठा, आरोग्यविषयक सुविधा व औषधोपचार, दुर्धर रोगासाठी भरीव आर्थिक मदत या उपाययोजना होतांना दिसत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
प्राप्त माहितीनुसार जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात किडनी रोगाने गेल्या तीन वर्षांत शंभराहून अधिक बळी घेतले आहेत. पिंपळगाव काळे, मडाखेड, जामोद, संग्रामपूर, सोनाळा, बावनबीर, वरवट बकाल, मनसगाव, आडसूळ या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये क्षारयुक्त पाण्यामुळे हजारो ग्रामीण नागरिकांना किडनी व पोटाच्या व्याधी जडल्या आहेत. या परिसरात मूतखडय़ाचे पाच हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. खारपाणपट्टय़ात क्षारयुक्त पाणी जीवघेणे ठरत असून शुध्द पाण्यासाठी उपाययोजनांना अतिशय विलंब लागत आहे. या गावांना शुध्द व क्षाररहित पाणीपुरवठा करण्याचे आदेश शासनाने वेळोवेळी दिले. मात्र, प्रत्यक्षात परिणामकारक अंमलबजावणी होतांना दिसत नाही. त्यामुळे किडनी बळी व ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशा पध्दतीची शासकीय कार्यपध्दती असून याचा राज्य शासनाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय गांभिर्याने विचारच करायला तयार नाही.
खारपाणपट्टय़ातील गावांना जोपर्यंत क्षाररहित व शुध्द पेयजल पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत किडनी रोग बळी व रोगग्रस्त रुग्णांची संख्या कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. किडनीग्रस्त रोग्यांची डायलेसिससाठी शेगाव, बुलढाणा व अकोला रुग्णालयात व्यवस्था आहे. त्याठिकाणी रुग्णांना पाठविले जाते. मात्र, किडनी व्याधीने ग्रस्त झालेले रुग्ण वाचण्याची कमी शक्यता असते. त्यामुळे मुळ समस्या सोडविण्यासाठी शुध्द पाण्याची व्यवस्था होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या प्रश्नावर मूलगामी व दूरगामी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा