गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने गुरुवारी दुपारपासून गडचिरोली-आरमोरी, वडसा, नागपूर मार्ग बंद झाला आहे, तर गडचिरोली ते चामोर्शी मार्गावरील पोटफोडी नदी व गोविंदपूर नाल्याला पूर आल्याने गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली, सिरोंचा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या दोन आठवडय़ात तिसऱ्यांदा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मालेवाडा ते कुरखेडा मार्गही बंद झाला आहे. टिपागडी नदीला पूर आल्याने धानोरा ते जयसिंगटोला मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. पुराचे पाणी जयसिंगटोला, तसेच मालेवाडा गावात शिरल्याने या गावातील २० ते २५ कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. खोब्रागडी नदीला पूर आल्याने नागरवाही, मंगरटोला गावांचा संपर्क तुटला आहे.
धानोरा तालुक्यातील चिचोली आणि खांबाळा ही गावे चारही बाजूने पुराने वेढलेली आहेत. धानोरा तसेच कुरखेडा तालुक्यातील काही गावांना पुराचा जबर तडाखा बसल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे कार्य आरंभले आहे. धानोरा तालुक्यातील मेंढा, केलारबोडी येथील गाव तलाव फुटल्याने पाणी गावात शिरले आहे. चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथील तलाव फुटल्याने शेती पाण्याखाली आलेली आहे. जिल्ह्य़ात गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासात ५१.१५ मि.मी. सरासरीने ६१३.७८ मि.मी. पावसाची नोंद  करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, अहेरी आणि सिरोंचा तालुक्यात आठवडय़ापासून जोरदार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे अहेरी येथील अहेरी इस्टेटच्या मालकीचा मोठा तलाव फुटल्याने तलावाचे पाणी गावात शिरून अहेरी येथील अनेक घरांची पडझड झाली. अहेरी तालुक्यातील एक इसम नाल्याच्या पुरात वाहून गेला, तर एटापल्ली तालुक्यातील एका महिलेचा बोडीत बुडून मृत्यू झाला. सिरोंचा तालुक्यालाही पुराचा फटका बसून अंदाजे ५ हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. पुरामुळे अहेरी उपविभागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
गेल्या सोमवारी अहेरी तालुक्यातील मोसम येथील जितेंद्र गणपत मडावी (२२) हा इसम मोसम नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला. तो दुपारी २ वाजताच्या सुमारास गुरे चारण्यासाठी शेताकडे गेला होता. त्यानंतर तो घरी परत आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता मोसम नाल्याच्या काठावर त्याचा मृतदेह आढळून आला. एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली येथील सरगुणा लागू लेकामी (३५) ही महिला २२ जुलैला दुपारी ४ वाजता शेताकडे जात असताना ती अचानक एका बोडीतील पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी अहेरी येथील भुजंगरावपेठाजवळील अहेरी इस्टेटच्या मालकीचा मोठा तलाव फुटल्याने तलावाचे पाणी गावात शिरून भुजंगरावपेठ आणि अहेरी येथील पाच ते सहा घरांची पडझड झाली. प्राणहिता व गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आंध्रप्रदेश सीमेलगतच्या सिरोंचा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या तालुक्यातील अंदाजे ५ हजार हेक्टर शेती पाण्याखाली आलेली आहे. गोदावरी व प्राणहिता नदी काठावरील शेकडो गावांचा संपर्क तुटलेला असून आसरअल्लीजवळील येर्रावागु नाल्यावरील पूल वाहन गेल्याने जवळजवळ ५० गावांचा संपर्क तुटला होता.
या भागातील मोबाईल व दूरध्वनी सेवाही बंद पडली असून विद्युत पुरवठाही बंद होती. सिरोंचा तालुक्यातील मोयाबिनपेठा, रेगुंठा, नरसिंहपल्ली, टेकडाताला, बामणी, आयपेठा,  सिरोंचा, नगरम या परिसरातील शेती प्राणहिता नदीच्या पाण्याखाली आली आहे. तालुक्यातील १५० कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सिरोंचाचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे अनेक गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एटापल्ली तालुक्यातही आठवडय़ापासून मोबाईल सेवा बंद होती. वीज पुरवठा सतत खंडित होत होता. पुरामुळे कर्मचारी अडकलेले असल्याने कार्यालये ओसाड झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा