राज्यातील मराठा समाजाला इतर मागासवर्ग या प्रवर्गात समाविष्ट करण्यासंदर्भात उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आढावा समितीची सोमवारी नाशिक येथे बैठक होणार आहे.
राज्यातील मराठा समाजाचा इतर मागास वर्ग या प्रवर्गात समावेश करण्याबाबत आढावा घेऊन शासनास योग्य त्या शिफारशी करण्यासाठी राणे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे मंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री, अपर मुख्य सचिव, सामाजिक न्याय सचिव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक आदींचा समावेश आहे.
मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करणे, या विषयाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना यांची मते जाणून घेणे, मराठा समाजाची लोकसंख्या आणि त्या समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थान विचारात घेणे आदी मुद्यांवर समिती अभ्यास करत आहे.
सोमवारी ही समिती नाशिक विभागाच्या दौऱ्यावर येत आहे. नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी अकरा वाजता समितीची बैठक होणार आहे. या संदर्भात सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व इतर सर्व संबंधितांनी त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात समितीसमोर सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदन देण्यासाठी येणाऱ्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या कार्यालयाकडील विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराकडून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ईदगाह मैदानावर वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवेदन देण्यासाठी येणाऱ्या केवळ सहा जणांनाच एकावेळी प्रवेश दिला जाईल. त्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा