येत्या निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने पत्रकार परिषदेत केली. मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. याबद्दल राजकीय मराठय़ांना काहीही सोयरसुतक नाही. म्हणूनच आरक्षणाच्या चळवळीत कोणताही राजकीय नेता नेतृत्व करण्यास तयार नाही. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मराठा नेत्यांनी पुढे येण्याऐवजी दलित समाजाच्या नेत्याने मराठय़ांचे नेतृत्व करावे, याबद्दल पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रगीतात देखील मराठा हा शब्द रवींद्रनाथ टागोर यांनी वापरला. तो मराठा आज कुठे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यातील बहुसंख्य मराठा आहेत. जमीन कसण्यास त्यांच्याकडे पैसा नाही. मुलांना निटपणे शिक्षण घेता येत नाही. वयात आलेल्या मुलींचा विवाह करणेदेखील कठीण होऊन बसले आहे. अशा मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची खंत परिषदेत व्यक्त करण्यात आली. रविवारी २७ जानेवारीला मराठा महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बहुसंख्येने मराठा नेतृत्व सत्तेवर दिसतात. परंतु यातील बहुसंख्याक हे केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच आहेत. मराठा समाजाच्या तुलनेने त्यांची संख्या पाच टक्के देखील नाही. हे पाच टक्के सत्ताधारी म्हणजे समस्त मराठा नव्हे.अनेक जाती जमातीने त्यांच्या पाठीमागे मराठा हा शब्द मिरवणे सुरू केले. त्यात मराठा कुणबी, मराठा धनगर, मराठा परीट वगैरे वगैरे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. येत्या निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी जोरकस मागणी अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी केली. पत्रकार परिषदेत अ‍ॅड. सरिता सावंत, उषा जाधव, सुशिला जाधव, महेश सावंत, गजेंद्र बढे आणि विजय गुजर आदी उपस्थित होते.