बाराहून अधिक तारकांचा अनोखा नृत्याविष्कार सादर करणारा ‘मराठी तारका’ हा कार्यक्रम आता पहिल्यांदाच सातासमुद्रापार लंडन येथे १० ऑगस्ट रोजी होणार आहे. महेश टिळेकर दिग्दर्शित या कार्यक्रमाने गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळेच तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये तारकांना आपला नृत्याविष्कार दाखविण्याची संधी मिळाली होती. राज्यात तसेच देशात अनेक ठिकाणी ‘मराठी तारका’ कार्यक्रम सादर करण्यात आला आहे, पण आता पहिल्यांदाच या तारका सातासमुद्रापार लंडन येथे जाऊन आपली कला सादर करणार आहेत. याबाबत बोलताना महेश टिळेकर यांनी सांगितले की, लंडन येथील महाराष्ट्र मंडळाच्या मदतीसाठी हा कार्यक्रम वेम्बली येथे होणार आहे. हा कार्यक्रम पहिल्यांदाच होणार असल्याने लंडनमधील अनेक महाराष्ट्रवासीय उत्सुक असून आम्हाला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही टिळेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमानंतर सर्व तारकांना येथील प्रसिद्ध ‘लायन किंग’ हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच लंडनहून येताना इस्तंबूल येथेही या सर्व तारका भेट देणार असून तेथील लोककला पाहण्याची अनोखी संधी त्यांना मिळणार आहे.