० वाङ्मय गौरव पुरस्कारांचे वितरण
० २७ मराठी संकेतस्थळांचे उद्घाटन
० विश्वकोशाचे खंड १७ ते १९ इंटरनेटवर
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बुधवार, २७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने राज्य वाङ्मय पुरस्कार, विंदा जीवन गौरव आणि श्री. पु. भागवत पुरस्कारांचे वितरण एका विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २७ मराठी संकेतस्थळांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
वाङ्मय पुरस्कार
मराठी भाषा विभाग आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात २०११ या वर्षांचे राज्य वाङ्मय पुरस्कार व गौरववृत्ती प्रदान सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. २०११ या वर्षांचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार प्रा. के. ज. पुरोहित उर्फ शांताराम यांना तर ‘श्री. पु. भागवत प्रकाशक’ पुरस्कार नवचैतन्य प्रकाशन यांना प्रदान करण्यात येणार आहे. सुधीर रसाळ व वसंत अवसरीकर यांना गौरववृत्ती प्रदान केली जाणार असून यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार, सरफोजीराजे भोसले उत्कृष्ट निर्मिती-प्रकाशक पुरस्कार, उत्कृष्ट मराठी संकेतस्थळ पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या निमित्ताने सकाळी ११ ते ८ या वेळेत याच ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
विश्वकोश- इंटरनेट आवृत्तीचे प्रकाशन
मराठी विश्वकोशाचे खंड १७ ते १९ हे इंटरनेटवर टाकण्यात आले असून त्याचे प्रकाशनही या वेळी होणार आहे. साहित्य संस्कृती मंडळ तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या बोलक्या पुस्तकांचेही उद्घाटन या वेळी होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी ३ ते ८ या वेळेत होणार आहे. विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड (प्रमुख संपादक), गोविंद फडके, डॉ. सु. र. देशपांडे (विभाग संपादक), ‘सी-डॅक’चे सहसंचालक महेश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यासाठी योगदान दिले आहे.
२७ मराठी संकेतस्थळे
शिवसेनाप्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे वांद्रे (पश्चिम) येथील रंगशारदा सभागृहात दुपारी ३.३० ते ७.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २७ मराठी संकेतस्थळांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सचिन पिळणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संकेतस्थळे तयार केली आहेत. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध विषयांवरील ही संकेतस्थळे आहेत.
गीत नवे गाईन मी
संस्कार भारतीच्या दादर समितीतर्फे ‘गीत नवे गाईन मी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठीतील काही अभिजात कविता डिजिटल ट्रॅकवर गायक विनायक जोशी, रंजना जोगळेकर सादर करणार आहेत. या कविता उदय चितळे यांनी संगीतबद्ध केल्या असून कार्यक्रमाचे निवेदन सीमा देशमुख यांचे आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता साने गुरुजी विद्यालय, दादर (पश्चिम) येथे होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा