मराठी भाषा दिन आला, की एका दिवसापुरते मराठीच्या प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या महाराष्ट्रात मराठी भाषा भवनाचे स्वप्न मात्र वर्षभरानंतरही लोंबकळतच राहिले आहे. मुंबईत रंगभवन येथे ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या वर्षी विधिमंडळात केलेली घोषणा ‘बोलाचा भात’च ठरली आहे. मराठी भाषा भवनाची साधी वीटही अद्याप रचली गेलेली नाही.
मराठी भाषेच्या संदर्भात काम करणारे सर्व विभाग एकाच छत्राखाली एकाच ठिकाणी एकत्र आणण्यासाठी मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्याच्या घोषणा राज्य सरकारने गेल्या दीडदोन वर्षांत वारंवार केल्या. गेल्या वर्षी रवींद्र नाटय़ मंदिर येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठीच्या शासकीय योजनांचा पाढा वाचला, तेव्हा मराठीप्रेमींनी टाळ्यांचा कडकडाटही केला होता. वांद्रे येथील रंगभवनच्या परिसरात मराठी भाषा भवन उभे राहणार आणि मंत्रालयासमोर लक्तरे लेऊन उभ्या असलेल्या माय मराठीला स्वतचे घर मिळणार या कल्पनेने मराठी मने हरखून गेली होती.. या मराठी भाषा भवनात राज्य शासनाचे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे सर्व विभाग हातात हात घालून एकत्र काम करणार अशी योजनाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती. प्रत्यक्षात मात्र, अजूनही हे सारे विभाग आपापल्या टीचभर छपराखाली, एकमेकांकडे पाठ करूनच आपापले व्यवहार पार पाडत आहेत. गेल्या वर्षभरात भाषा भवनाच्या उभारणीचे केवळ प्रशासकीय कागदी घोडे इकडून तिकडे नाचले. ज्या जागेत हे मराठी भाषा भवन बांधले जाणार आहे, त्या रंगभवनाची जागाही अद्याप ताब्यात आली नसल्याने इमारत तर दूरच, साधे भूमिपूजन किंवा एक वीटही रचली गेलेली नाही. दरवर्षीप्रमाणे उद्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा होईल, पुन्हा मराठी भाषा भवनाच्या जुन्या घोषणा नव्या दमाने दिल्या जातील, पुन्हा टाळ्यांचे कडकडाट होतील आणि ‘नेमेचि येतो..’ या उक्तीप्रमाणे सारे पहिल्यासारखेच सुरू राहील, अशी खंत मराठी भाषा प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा